मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:31 IST2025-07-15T14:30:21+5:302025-07-15T14:31:32+5:30
Nimisha Priya News: येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे.

मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी
येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे. निमिषा प्रिया १६ जुलै रोजी येमेनमधील तुरुंगात फाशी देण्यात येणार होती. मात्र भारत सरकारकडून मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न आणि पडद्यामागून घडलेल्या घडामोडींनंतर निमिषा प्रिया हिला देण्याात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी टळली आहे.
केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असलेली निमिषा प्रिया २००८ मध्ये रोजगारासाठी येमेनला गेली होती. दरम्यान, २०१७ साली तलाल अब्दो महदी या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. तलाल हा निमिषाचा व्यवसायातील भागीदार होता. दरम्यान, २०२० मध्ये तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. तसेच तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेची अंमलबजावणी १६ जुलै रोजी होणार होती.
दरम्यान, निमिषा हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा टाळण्यासाठी भारतामधून सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. तसेच निमिषाने हत्या केलेल्या तलाल अब्दो महदी याच्या नातेवाईकांना स्थानिक कायद्यांनुसार ब्लड मनी देण्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव त्यांनी नाकारला होता. याचदरम्यान, भारताचे ग्रँड मुफ्ती कंठपुरम एपी अबूबकर मुसलियार यांनीही या प्रकरणी पुढाकार घेतला होता. तसेच ग्रँड मुफ्तींच्या विनंतीनंतर येमेनमध्ये या प्रकरणावर विचारविनिमय सुरू झाला होता. या प्रयत्नांचं नेतृत्व येमेनचे प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर करत होते. शेख हबीब यांचे प्रतिनिधी हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांनी उत्तर यमनमध्ये एका तातडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत त्यांनी येमेनी सरकारचे प्रतिनिधी, फौजदारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, तलालचा भाऊ आणि आदिवासी नेत्यांशी चर्चा केली होती. त्याशिवाय भारत सरकारकडून इतर मार्गांनीही निमिषाची फाशी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू होते.