मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:39 IST2025-08-01T15:39:00+5:302025-08-01T15:39:47+5:30
Kangana Ranaut in trouble: एक पोस्ट रिट्विट केल्याने कंगना अडचणीत, वाचा सविस्तर

मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
Kangana Ranaut in trouble: हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपा खासदार आणि चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत हिला पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा दावा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. हे प्रकरण २०२१ चे आहे, जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होते. त्या काळात कंगनाने केलेल्या पोस्टवरून ती अडचणीत आली होती.
नेमके प्रकरण काय?
कंगनाच्या ट्विटनंतर महिंदर कौर यांनी ४ जानेवारी २०२१ रोजी मानहानीचा खटला दाखल केला होता. ही सुनावणी सुमारे १३ महिने चालली. त्यानंतर भटिंडा न्यायालयाने कंगनाला समन्स जारी केले आणि तिला हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर कंगनाने पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली, ती आता फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कंगनाने म्हटले होते की, तिने एका वकिलाची पोस्ट रिपोस्ट केली होती. कंगनाच्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणात भटिंडा न्यायालयात पुढील कार्यवाही होईल.
याचिका फेटाळली, न्यायालयाचे मत काय?
कंगनाची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती त्रिभुवन सिंह दहिया यांनी महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात जो याचिकाकर्ता आहे, तो एक सेलिब्रिटी आहे. अशा व्यक्तीने विशिष्ट आरोप केल्याने रिट्विटमध्ये उल्लेख केलेल्या महिलेची खोट्या आणि अपमानास्पद आरोपांमुळे प्रतिष्ठा खराब झाली. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील सर्व पैलूंचा योग्य प्रकारे विचार केला आहे. कंगनाच्या विरोधात प्रथमदर्शनी मानहानीचा खटला (कलम ४९९) तयार झाल्याचा निर्णय दिल्यानंतरच त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. आता कंगनाला पंजाबच्या स्थानिक न्यायालयात या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.