इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्य, 'नाविक' प्रणालीसाठी गंभीर संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:34 IST2026-01-12T15:33:52+5:302026-01-12T15:34:53+5:30
ISRO Failure: या अपयशामुळे भारतीय लष्कराची टेहळणी क्षमता आणि देशाची स्वदेशी GPS प्रणाली 'नाविक' (NavIC) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्य, 'नाविक' प्रणालीसाठी गंभीर संकट
ISRO Failure: भारताची अत्यंत विश्वासार्ह समजली जाणारी 'वर्कहॉर्स' रॉकेट प्रणाली, पीएसएलव्ही (PSLV), एका महत्त्वाच्या मोहिमेत आलेल्या अडथळ्यामुळे अपयशी ठरली. पीएसएलव्ही-सी६२ (PSLV-C62) या मोहिमेद्वारे भारताचे सामरिक महत्त्व असलेले १६ उपग्रह अवकाशात झेपावणार होते, मात्र हे सर्व उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचू शकले नाहीत. या अपयशामुळे भारतीय लष्कराची टेहळणी क्षमता आणि देशाची स्वदेशी जीपीएस प्रणाली 'नाविक' (NavIC) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
लष्करी सुरक्षेला बाधा
या मोहिमेचा मुख्य उद्देश 'EOS-N1' (Anvesha) हा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह अवकाशात पाठवणे हा होता. हा उपग्रह डीआरडीओने (DRDO) विकसित केला होता. जमिनीचे अचूक मॅपिंग आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हा उपग्रह लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. या अपयशामुळे लष्कराच्या 'स्पाय सॅटेलाईट' क्षमतेला मोठा फटका बसला आहे.
'नाविक' प्रणाली व्हेंटिलेटरवर?
या अडथळ्याचा सर्वाधिक परिणाम भारताच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीवर (NavIC) होणार आहे. सध्या नाविक प्रणालीतील ११ उपग्रहांपैकी केवळ ४ उपग्रह कार्यरत आहेत. त्यातील दोन उपग्रहांची कालमर्यादा संपली आहे, तर उर्वरित दोन उपग्रहांची क्षमता आता कमी होत आहे. नाविक प्रणाली सुरू ठेवण्यासाठी Atomic Clocks अत्यंत आवश्यक असतात, मात्र बहुतांश उपग्रहांची ही clocks निकामी झाली आहेत. जर लवकरच पर्यायी उपग्रह पाठवले गेले नाहीत, तर भारताची स्वतंत्र नेव्हिगेशन यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
घातपाताची शक्यता आणि पारदर्शकतेवर प्रश्न
गेल्या काही वर्षांत इस्रोच्या सामरिक मोहिमांना (उदा. मे २०२५ मधील PSLV-C61) लागोपाठ अपयश येत असल्यामुळे सोशल मीडियावर 'घातपाता'चा (Sabotage) संशय व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी यामागे विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता वर्तवत सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच, इस्रोने यापूर्वीच्या अपयशांचे 'फेल्युअर ॲनॅलिसिस रिपोर्ट' (FAC) अद्याप सार्वजनिक न केल्यामुळे पारदर्शकतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इस्रोच्या ३३ वर्षांच्या इतिहासात हे केवळ चौथे मोठे अपयश आहे, मात्र सामरिक दृष्टिकोनातून हे अपयश अत्यंत गंभीर मानले जात आहे.