मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:53 IST2025-11-13T14:45:23+5:302025-11-13T14:53:09+5:30
स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर, डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत “व्हाईट कॉलर टेरर” मॉड्यूलशी संबंधित 200 हून अधिक लोकांची चौकशी झाली आहे.

मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटानंतर, तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून या प्रकरणाचे धागे जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर जम्मू-कश्मीर पोलिसांनी आतापर्यंत 500 ठिकाणी छापेमारी करून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी संघटनेविरुद्ध करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघटनेने पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे थांबवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर, कुलगाम, पुलवामा, शोपियां आणि बारामुला आदी. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. दरम्यान, दहशतवादी डॉक्टर मॉड्यूलविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. तीन सरकारी कर्मचारी आणि इतर सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यांमधूनही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीतून सोर आले आहे की, काही संशयित गेल्या वर्षभरात तुर्कीला गेले होते. स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर, डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत “व्हाईट कॉलर टेरर” मॉड्यूलशी संबंधित 200 हून अधिक लोकांची चौकशी झाली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडूनच या मॉड्यूलचा खुलासा झाला आहे.
बारामुल्लाच्या सोपोर परिसरात पोलिसांनी 30 ठिकाणी छापेमारी केली असून त्यातून, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि बंदी घातलेल्या संघटनेचे पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमात-ए-इस्लामी पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.