दुसऱ्या राज्यांतही लागू होणार गुजरात लॅबमधून निघालेला फॉर्म्युला, भाजपनं सांगितला फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 19:15 IST2021-09-16T19:11:10+5:302021-09-16T19:15:03+5:30
नवे नेतृत्व घडवणाऱ्या या प्रयोगातून देशभरात प्रेरणा मिळू शकते. गुजरातचे भाजपचे प्रभारी आणि केंद्र सरकारमधील मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला...

दुसऱ्या राज्यांतही लागू होणार गुजरात लॅबमधून निघालेला फॉर्म्युला, भाजपनं सांगितला फायदा!
भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणुकीच्या एक वर्ष आधी गुजरात सरकारचा कर्णधारच बदलला नाही, तर संपूर्ण टीमच बदलून टाकली आहे. गुजरातमध्ये गुरुवारी नवीन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या 24 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकाही जुन्या चेहऱ्याचा समावेश नाही. या नो-रिपीट फॉर्म्युल्याला भाजपने नवा लोकशाही प्रयोग म्हणून संबोधले आहे. यापूर्वीही भाजपने गुजरातमध्ये केलेले अनेक प्रयोग इतर राज्यांमध्ये राबवून राजकीय लाभ मिळविला आहे. मात्र, आता या 'नो रिपीट' फॉर्म्युल्याला कितपत यश मिळते, हे पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. (Bharatiya janata Party BJP hints to use no repeat formula of Gujarat in other states also)
२०२४ चा विजयी महामार्ग! गडकरींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचं ‘मिशन २०० प्लॅन’
भाजपने म्हटले आहे की, नवे नेतृत्व घडवणाऱ्या या प्रयोगातून देशभरात प्रेरणा मिळू शकते. गुजरातचे भाजपचे प्रभारी आणि केंद्र सरकारमधील मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना याला नवा प्रयोग म्हटले आहे. याच बोरोबर त्यांनी राज्यातील जुने नेतृत्व आणि माजी मंत्र्यांच्या नाराजीचे वृत्त फेटाळून लावत दावा केला, की हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून ते सर्व नेतेही शपथविधी समारंभात व्यासपीठावर आणि समोर उपस्थित होते. एक पक्ष, जो स्थिरता आणि सातत्याने काम करतो, तो नव्या नेतृत्वाला जन्म देतो.
यादव म्हणाले, जुन्या नेत्यांचा अनुभवासोबत नवीन नेतृत्वाखालील सरकार आणि संघटना यांचे सामंजस्याने काम सुरू राहील. भाजप असा प्रयोग देशभरात करू शकतो का? असा प्रश्न केला असता, या लोकशाही प्रयोगातून प्रत्येकाला प्रेरणा मिळू शकते, असे यादव म्हणाले. एवढेच नाही, तर एका कुटुंबातही नवीन नेतृत्व निर्माण केले जाते. जेणेकरून सातत्य राखले जाईल. ज्येष्ठ लोकांचा अनुभव संस्थेसाठी उपयुक्त ठरेल आणि ते पक्षाचे कामही पुढे नेतील, असेही यादव म्हणाले.