बंगळुरूमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाडेकरूंना घरमालकांची अरेरावी, भाड्याने घर शोधण्यात येणाऱ्या अडचणी, मनमानी पद्धतीने आकारले जाणारे वीज आणि पाण्याच्या बिलासारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळे भाडेकरूंच्या समस्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
बंगळुरूमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीला आलेलं पाण्याचं बिल व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दरमहा लाखो लीटर पाणी वापरण्यासाठी दोन लोकांना भलमोठं बिल देण्यात आलं आहे. Reddit च्या r/Bangalore फोरमवर युजरने एक पोस्ट लिहिली आणि सांगितलं की, त्याचा घरमालक दरमहा त्याच्यावर पाण्यासाठी मोठं बिल आकारतो.
पोस्टनुसार, आम्ही फक्त दोन लोक आहोत, बहुतेक वेळा आम्ही ऑफिसमध्ये असतो. कधीकधी आठवड्यातून १-२ दिवस पाणीपुरवठा होत नाही. तरीही, दरमहा १०,००० रुपयांपर्यंतचे बिल येतं. अलीकडेच १.६५ लाख लीटर पाण्याच्या वापराचं बिल आलं, ज्याची एकूण रक्कम १५,७९९ रुपये होती. या पोस्टनंतर अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले.
एका युजरने दोन लोकांच्या घराचं पाण्याचं बिल ३०० रुपयांपेक्षा जास्त नसावं... असं म्हणत थेट BWSSB कार्यालयात जा आणि तक्रार करा असा सल्ला दिला आहे. दुसऱ्याने त्याचा अनुभव सांगितला आणि म्हटलं की, त्याच्या घरातील मीटर खराब होता, पण BWSSB ते बदलण्यास तयार नव्हते... आम्ही फक्त पाणीपुरवठा करताना मीटर चालू करायला सुरुवात केली आणि बिल ४००-५०० रुपये आलं.