Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:45 IST2025-10-12T17:44:55+5:302025-10-12T17:45:26+5:30
झटका आल्यामुळे चालकाने ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर दाबले.

Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
बंगळुरू- शहरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी BMTC बसच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात चिन्नास्वामी स्टेडियमजवळ, तर दुसरा राजाजीनगरमध्ये झाला. दोन्ही घटनांमुळे शहरात वाहतूक विस्कळीत झाली असून BMTC प्रशासन आणि वाहतूक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एका बीएमटीसी बसने नियंत्रण गमावले आणि नऊ वाहनांना धडक दिली. चालकाला अचानक झटका आल्याने चुकून अॅक्सिलरेटर दाबला गेला. या अपघातात एका ऑटोचालकाला गंभीर दुखापत झाली असून, इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर क्यूबन पार्क वाहतूक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे.
BMTC Bus Collides with 9 Vehicles Near Chinnaswamy Stadium
— Karnataka Portfolio (@karnatakaportf) October 11, 2025
A serious accident occurred near the 9th gate of Chinnaswamy Stadium when a BMTC bus collided with nine vehicles, including three autos, three cars, and several bikes. The condition of the auto driver is reported to be… pic.twitter.com/eeDI0mZ14x
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यात चालकाला झटका आल्याने बस वेगाने पुढे वाहनांना एकामागोमाग एक धडक देताना दिसते. बसच्या कंडक्टरने बस थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
राजाजीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
शहरातील दुसरी घटना राजाजीनगरमधील पंचजन्य विद्यापीठ शाळेजवळ घडली. ९ वर्षीय मुलगी आपल्या दोन बहिणींसह रस्ता ओलांडत असताना BMTC बसने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.