"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:16 IST2026-01-09T19:16:18+5:302026-01-09T19:16:48+5:30
Mamata Banerjee vs BJP: "मी कधीही कुणाला डिवचत नाही, पण मला त्रास दिला तर मी सोडणार नाही"

"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
Mamata Banerjee vs BJP: पश्चिम बंगालमध्ये I-PAC कार्यालयावर ईडीने छापा टाकला. या छाप्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे पक्षाच्या नेत्यांसोबत एक रॅली काढली. ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ आयोजित या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "मी केंद्र सरकारला आणि भाजपला आव्हान देते की तुम्ही माझ्याशी नीट वागा. भाजप हे हरयाणा आणि बिहारमध्ये बळजबरीने सत्तेत आले आहेत. काही इतर राज्यातही ते हा पॅटर्न राबवताना दिसत आहेत. आता तर बंगालमध्येही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. घोटाळ्याचे पैसे कोणी वापरले ते मला विचारा."
जर मला कुणी दुखावलं तर मी त्याला सोडत नाही!
"मी कधीही कुणाला डिवचत नाही, कुणालाही त्रास द्यायला जात नाही. पण जर कोणी मला दुखावले तर मी त्यांना सोडत नाही. SIR च्या नावाखाली भाजपचे लोक स्थानिक लोकांना लक्ष्य करतात. ते वृद्धांना आणि गर्भवती महिलांनाही त्रास देतात. जर तुम्ही बंगाली बोललात तर ते तुम्हाला बांगलादेशी घोषित करतात. बंगालमध्ये रोहिंग्या आहेत, पण ते कुठे आहेत? जर आसाममध्ये रोहिंग्या नाहीत, तर तिथे एसआयआर का सुरू केला गेला नाही? हे सर्व केले जात आहे कारण ते महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये जसे केले होते. तसेच बंगालमध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य नाही," असे ममतदीदींनी खडसावले.
जर मी तोंड उघडलं तर...
"आम्ही सध्या भाजपशी कठोरतेने वागत आहोत. संघर्ष करायचाच असेल तर आम्ही शक्य ते सर्वकाही करू. जर मी तोंड उघडले तर संपूर्ण देश हादरून जाईल. काही विशेष प्रकारचे निधी कुणाला मिळतात हे आम्हाला माहितीये. जर मी याबद्दल बोलले तर संपूर्ण देश हादरेल. माझ्याकडे सर्व माहिती आहे. जर मी तोंड उघडले तर अनेक लोक अडचणीत येतील. जर तुम्ही हल्ला केला तर मी प्रत्युत्तर देईन. मला प्रत्युत्तर कसे द्यायचे हे माहित आहे. भाजपचा निर्णय सार्वजनिक व्यासपीठावर घेतला जाईल. तुम्ही कुठे निवडणूक लढवता ते मला पहायचे आहे," असा थेट इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.