विश्वास ठेवा किंवा नाही... भाजपा आमदाराला पडलेलं स्वप्न 24 तासांत खरं ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 17:06 IST2022-01-11T16:07:06+5:302022-01-11T17:06:44+5:30
आमदार मोहन ढोडिया यांनी दावा केला की, रविवारी दुपारी दिवसभरातील कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे थकवा आल्याने आपण दुपारी 4 वाजता हलकी झोप घेतली

विश्वास ठेवा किंवा नाही... भाजपा आमदाराला पडलेलं स्वप्न 24 तासांत खरं ठरलं
अहमदाबाद - गुजरातमधील एका आमदाराला पडेलल्या स्वप्नाची आणि काही तासांतच ते स्वप्न सत्यात उतरल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. महुवा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते आणि आमदार मोहन ढोडिया यांनी सांगितलेल्या दाव्यावर विश्वास ठेवावा की नाही, अशी परिस्थिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण, त्यांना पडलेलं स्वप्न काही तासांतच खरं झालं आहे.
आमदार मोहन ढोडिया यांनी दावा केला की, रविवारी दुपारी दिवसभरातील कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे थकवा आल्याने आपण दुपारी 4 वाजता हलकी झोप घेतली. विशेष म्हणजे 10 मिनिटांच्या या झोपेत एक स्वप्न पडलं, जे स्वप्न सोमवारी खरंही ठरलं. मोहनभाई यांच्या स्वप्नात त्यांचे मित्र मतदारसंघातली ज्येष्ठ रनाभाई ढोडिया आले होते, रनाभाई यांनी मी आता मरणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, मोहनभाई यांनी रनाभाई यांच्या घरी भेट दिली. तेव्हा ते आजारी असल्याने बेडवरच झोपून होते.
मोहनभाई यांनी रनाभाईची भेट घेतली, त्यावेळी काळजी करू नका. आपण लवकरच आजारपणातून बरे व्हाल, असे सांगतिले. तसेच, तेथील स्थानिक रहिवाशांनाही रनाभाई यांची काळजी घेण्याचे बजावले. मात्र, दुसऱ्यादिवशी सोमवारी गांधीनगरकडे जात असताना, मोहनभाई ढोडिया यांना कॉल आला. त्यामध्ये, रनाभाईंचे निधन झाल्याची वार्ता त्यांच्या कानावर पडली. त्यामुळे आमदार ढोडिया यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच, जे स्वप्न पडलं ते खरं झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. द न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.