विधानसभा ते लाल किल्ल्याला जोडणारे भुयार; दिल्लीत ब्रिटिशकाळातील बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:26 AM2021-09-04T08:26:08+5:302021-09-04T08:27:47+5:30

स्वातंत्र्यसेनानींना नेण्यासाठी वापर

Basement connecting Vidhan Sabha to Red Fort; British-era construction in Delhi pdc | विधानसभा ते लाल किल्ल्याला जोडणारे भुयार; दिल्लीत ब्रिटिशकाळातील बांधकाम

विधानसभा ते लाल किल्ल्याला जोडणारे भुयार; दिल्लीत ब्रिटिशकाळातील बांधकाम

googlenewsNext

नवी दिल्ली :  दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला व दिल्ली विधानसभा इमारत यांना जोडणारे एक जुने भुयार सापडले आहे. स्वातंत्र्यसेनानींची ने-आण करताना कोणीही प्रतिशोधातून हल्ले चढवू नयेत म्हणून ब्रिटिश या भुयाराचा वापर करत असत, असे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले.

ते म्हणाले की, १९९३ साली मी आमदार झालो. तेव्हापासून या भुयाराबाबत ऐकत आलो आहे. त्याबाबत इतिहासात काही तपशील मिळतात का हेही मी पाहिले. पण त्यावेळी फारशी माहिती हाती लागली नव्हती. आता या भुयाराचे प्रवेशद्वार आम्हाला गवसले आहे. मात्र त्यातील मार्गांचा शोध घेतला जाणार नाही.  कारण दिल्लीतील मेट्रो प्रकल्प तसेच मलनि:सारण प्रकल्पांसाठी जागोजागी खणताना या भुयारातले मार्ग नष्ट झाले आहेत. 

रामनिवास गोयल यांनी सांगितले की, ब्रिटिशांनी देशाची राजधानी कोलकाता येथून १९१२ साली दिल्लीला हलविली.  दिल्ली विधानसभेची इमारत ही आधी केंद्रीय विधानसभा म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर ही इमारत १९२६ साली न्यायालय म्हणून वापरण्यात येऊ लागली. त्यावेळी विविध खटल्यांसाठी न्यायालयात स्वातंत्र्यसेनानींना आणताना ब्रिटिश या भुयाराचा वापर करीत असत. 

फाशीघरामध्ये करणार संग्रहालय

दिल्ली विधानसभेच्या इमारतीत पूर्वीपासून फाशीघर आहे हेही आम्हाला माहीत होते. पण ती जागा कधी उघडून बघितली नव्हती. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात या फाशीघराच्या जागेत स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्याचा आमचा विचार आहे, असे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले. हे फाशीघर पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनापासून पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. त्यादृष्टीने आम्ही कामही सुरू केले आहे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Basement connecting Vidhan Sabha to Red Fort; British-era construction in Delhi pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.