खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:13 AM2024-06-11T08:13:38+5:302024-06-11T08:15:44+5:30

पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

extortion case filed against independent mp pappu yadav from purnia bihar | खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"

खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"

पूर्णिया : नुकताच लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. भाजप प्रणित 'एनडीए'ला बहुमत मिळाले. त्यामुळे 'एनडीए' सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या पप्पू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

पूर्णिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्निचर व्यावसायिकाने तक्रारीत म्हटले आहे की, ४ जून रोजी मतमोजणीच्या दिवशी पप्पू यादव यांनी व्यावसायिकाला आपल्या घरी बोलावले होते. जेव्हा व्यावसायिक हे पप्पू यादव यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांच्याकडे पप्पू यादव यांनी एक कोटी रुपये मागितले. तसेच, पप्पू यादव यांनी केवळ पैसेच मागितले नाही तर व्यावसायिकाला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पैसे दिले नाही तर ठार मारले जाईल, अशी धमकी पप्पू यादव यांनी दिल्याचे म्हटले आहे. याशिवाय, पप्पू यादव यांनी पुढील पाच वर्षे पूर्णियाचा खासदार राहणार असल्याचे सांगत आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास सांगितल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, एका फर्निचर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर अपक्ष खासदार पप्पू यादव आणि त्यांचे निकटवर्तीय अमित यादव यांच्याविरोधात मोफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय म्हणाले पप्पू यादव?
गुन्हा दाखल झाल्यानंतर पप्पू यादव यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. देशाच्या राजकारणातील माझा वाढता प्रभाव आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या आपुलकीमुळे नाराज झालेल्या लोकांनी आज पूर्णियामध्ये एक घृणास्पद कट रचला आहे. एका अधिकाऱ्याचे आणि विरोधकांचे हे षडयंत्र पूर्णपणे उघड होईल. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत निष्पक्ष तपास व्हावा आणि जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

Web Title: extortion case filed against independent mp pappu yadav from purnia bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.