बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:13 IST2025-09-27T15:11:58+5:302025-09-27T15:13:24+5:30
Bareilly Violence : याशिवाय पोलिसांनी 39 जणांना ताब्यात घेतले आहे.

बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये शुक्रवारी (26 सप्टेंबर) झालेल्या हिंसाचार प्रकरणी इत्तेहाद-ए-मिल्लत काउंसिल (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रजाला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेत बरेली पोलीस म्हणाले, शुक्रवारची नमाज झाल्यानंतर, पोलीस फोर्ससोबत धक्का-बुक्कीचा प्रकार घडला. या प्रकरणात 10 एफआयआर नोंदवण्यात आल्या असून मौलाना तौकीर रजासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी 39 जणांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाचे म्हणजे, 7 दिवसांपासून यासंदर्भात कटकारस्थान सुरू होते आणि यात बाहेरील लोकांचाही समावेश असल्याचे, पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी १० एफआयआर नोंदवण्यात आल्या असून, त्यांपैकी ७ मध्ये मौलाना तौकीर रजाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुराग आर्या यांनी खुलासा केला की, हा हिंसाचार सात दिवसांपासून सुनियोजित होता. पोलिसांनी चाकू, तमंचे, ब्लेड आणि पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी अविनाश सिंह म्हणाले, प्रशासनाला या कटाची माहिती मिळाली होती. बीएनएसएस कलम १६३ लागू करून कोणताही कार्यक्रम परवानगीशिवाय आयोजित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मौलाना तौकीर रजा आणि त्यांचे प्रतिनिधी नदीम व नफीज यांच्याशी नियमित संपर्क होता. आम्हाला पुढच्या दवसापर्यंत, त्यांच्याकडून सातत्याने सकारात्मक प्रतिक्रियेचे आश्वासन देण्यात आले. आमच्या गत बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी, आम्हाला नदीम आणि नफीज यांच्याकडून स्वाक्षरी असलेले एक पत्र मिळाले. ज्यात ते त्यांच्या योजनेवर पुढे जाणार नाहीत, असे होते.
शुक्रवारच्या नमाजनंतर काही लोकांनी इस्लामिया इंटर कॉलेजकडे जाण्याचा प्रयत्न करत शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. तत्पूर्वी, प्रशासनाने फ्लॅग मार्च करून शांततेचा संदेश दिला होता.