"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:42 IST2025-07-22T11:40:57+5:302025-07-22T11:42:35+5:30
बांगलादेशातील एका शाळेवर हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं. या अपघातातील मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे.

फोटो - ndtv.in
बांगलादेशातील एका शाळेवर हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं. या अपघातातील मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाका येथील लढाऊ विमानाच्या अपघातात मृतांचा आकडा २० वरून किमान २७ वर पोहोचला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेक शाळकरी मुलं आहेत.
सोमवारी चिनी बनावटीचं F-7 BGI विमान माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजवर कोसळलं. थोड्या वेळापूर्वीच मुलं शाळेतून निघाली होती. पण जेव्हा अपघात झाला तेव्हाही अनेक मुलं वर्गात उपस्थित होती. यामध्ये १७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पूर्णिमा दास या माइलस्टोन शाळेतील शिक्षिका आहेत. सोमवारी त्या मुलांना शिकवल्यानंतर टीचर्स रूममध्ये जाताच मोठा स्फोट झाला.
नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्या धावत बाहेर आल्या, पण जेव्हा त्या कॉरिडॉरवर पोहोचल्या तेव्हा एक भयानक दृश्य समोर होतं. मुलं घाबरून पळत होती आणि ती आगीमुळे ती होरपळली होती. शाळेवर विमान कोसळलं होतं. या घटनेने पूर्णिमा यांना धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांवरही या अपघाताचा मोठा परिणाम झाला, त्यांना त्यांच्या वर्गमित्रांना जळताना पाहावं लागलं.
परीक्षा संपवून नुकताच वर्गातून बाहेर पडलेल्या फरहान हसनने बीबीसी बंगालला सांगितलं की, "माझ्या डोळ्यासमोरच विमान शाळेच्या इमारतीवर कोसळलं. माझा सर्वात चांगला मित्र, ज्याच्यासोबत मी परीक्षा हॉलमध्ये होतो, त्याचा माझ्या डोळ्यासमोरच जळून मृत्यू झाला." अपघातात जखमी झालेल्या लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.