बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 10:48 IST2025-04-20T10:48:25+5:302025-04-20T10:48:51+5:30
Bangladesh News: गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत.

बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य
गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचदरम्यान, आता बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकारने असं काही पाऊल उचललं आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान आणि तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात झालेला एक करार मोडीत काढला आहे.
यासंदर्भात समोर येत असलेल्या वृत्तानुसार बांगलादेश दक्षिण त्रिपुरामधील मुहुरी नदीजवळ एक धरण बांधत आहे. हे धरण १.५ किलोमीटर लांब आणि २० फूट उंच आहे. या धरणामुळे भारताच्या हद्दीतील भूभागाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बांगलादेशने उचललेल्या या पावलामुळे स्थानिक लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या भागातील स्थानिक आमदार दीपांकर सेन यांनी याबाबत आवाज उठवला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करून तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे.
दीपांकर सेन यांनी सांगितले की, बांगलादेशच्या स्थापनेच्या वेळी मुजीब उर रहमान आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात एक करार झाला होता. या करारानुसार सीमारेषेवर झीरो लाईनपासून १५० यार्ड अंतरामध्ये कुठलंही बांधकाम होणार नाही, असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र बांगलादेशकडून आता उभारण्यात येत असलेलं धरण हे सीमेवरील झीरो लाईनपासून केवळ ५० यार्ड अंतरावर आहे. अनेक ठिकाणी हे अंतर केवळ १० यार्ड एवढंच आहे.
याआधी त्रिपुरामधील असे प्रकल्प केवळ इंदिरा गांधी आणि मुजीब यांच्यातील त्या करारामुळे रद्द करण्यात आले होते. मात्र आता बांगलादेशकडून जाणीवपूर्वक या धरणांचं बांधकाम केलं जात आहे, असा आरोप सेन यांनी केला.
दक्षिण त्रिपुराचे पोलीस आयुक्त सी. सेन यांनी सांगितले की, बांगलादेस या प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. तसेच ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे, त्या भागातील नेताजी सुभाषचंद्रनगर येथे ५०० हून अधिक कुटुंबांचं वास्तव्य आहे.