देशात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर प्रथम; पुणे ठरले दुसऱ्या क्रमांकाचे शहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 16:21 IST2021-03-04T16:21:02+5:302021-03-04T16:21:58+5:30
देशातील महानगरपालिकांच्या कार्यक्षमतेत इंदोर पहिल्या क्रमांकावर असून पिंपरी चिंचवड चौथ्या क्रमांकावर आहे.

देशात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर प्रथम; पुणे ठरले दुसऱ्या क्रमांकाचे शहर
पुणे : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून हे सर्वेक्षण केले जाते. यंदा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर असून अह्मदाबाद तिसऱ्या, चेन्नई चौथ्या, सुरत पाचव्या क्रमांकावर आहे.
देशातील महानगरपालिकांच्या कार्यक्षमतेत इंदोर पहिल्या क्रमांकावर असून सुरत दुसऱ्या, भोपाळ तिसऱ्या आणि पिंपरी चिंचवड चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच यावेळी पुण्याला पाचव्या स्थानावर ढकलत पिंपरी चिंचवडने चौथ्या क्रमांकावर फिनिक्स भरारी घेतली आहे. मात्र, सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये पिंपरी चिंचवड पहिल्या दहामध्येही नसल्याचे धक्कादायक चित्र सर्वेक्षणातून समोर आले आहे.
या सर्वेक्षणात संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल), सामाजिक (सोशल), आर्थिक (इकॉनॉमिक) आणि भौतिक सुविधा (फिजिकल) असे चार प्रमुख निकष आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, वीजवापर, सार्वजनिक मोकळ्या जागा अशा इतर पूरक निकषांवर प्रमुख शहरांची काटेकोर तपासणी करण्यात येते. त्यासाठी, संबंधित शहरातील काही नागरिकांशी संवाद साधण्यात येतो. नागरिकांकडून ऑनलाइन स्वरूपातही शहरातील राहणीमानाच्या दर्जाविषयी त्यांची मते जाणून घेण्यात येतात. या सर्व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची क्रमवारी निश्चित केली जाते.