आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:08 IST2024-12-16T18:45:12+5:302024-12-16T19:08:20+5:30

हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे.

Bajrang Sonawane demands death penalty for the accused in Sarpanch murder case | आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

Bajrang Sonwane ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. संतोष देशमुख यांच्या क्रूर खून प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी संसदेत केली.

"बीड जिल्ह्यातील हे प्रकरण देशातील कायदा व सुव्यवस्थेवरील मोठा आघात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिकाही बजरंग सोनवणे यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सातपैकी फरार असलेल्या चार आरोपींना लवकरात लवकर अटक होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधिमंडळात विरोधक आक्रमक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. त्यानंतर सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.

अंबादास दानवे यांच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असतं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो. अशा मंत्र्यांवरही कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सरकारवर सरकारी पक्षातील, विरोधी पक्षातील कोणाचाही आरोपीला वाचवा, असा दबाब आलेला नाही. आम्ही यामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी टेक्निकल आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  
 
पोलिसांची निष्क्रियता

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या नातेवाइकांची शनिवारी केज पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. तसेच अटक असलेल्या आणि सीआयडीकडे सुपूर्द केलेल्या आरोपींचीही पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी चौकशी सुरू केली आहे. असे असले तरी अजूनही चार आरोपी मोकाटच आहेत. तसेच परळी अहपरण, बीडमधील गोळीबार आणि केजमधील खून व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीही मोकाटच आहेत. या घटनांना चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपी मिळत नसल्याने पोलिसांचे नेटवर्क कमी पडतेय का? असा प्रश्न आहे. सरंपच देशमुख हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंदमध्ये सर्वच समाजांनी आणि राजकीय, सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवले. शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवली होती. शुक्रवारी दिवसभरात हा बंद शांततेत पाळला होता. यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. असे असले तरी पोलिसांच्या हाती या हत्या प्रकरणात केवळ तीनच आरोपी लागलेले आहेत. अजूनही चार आरोपी मोकाटच आहेत. सध्या हा तपास सीआयडीकडे वर्ग केला असला तरी आरोपी शोधासाठी बीड पोलिसही धावपळ करत आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आलेलं नाही.

Web Title: Bajrang Sonawane demands death penalty for the accused in Sarpanch murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.