करून दाखवलं! वडिलांनी दूध विकून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं; झाली IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 14:08 IST2023-08-08T13:56:06+5:302023-08-08T14:08:33+5:30
IAS Anuradha Pal : वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कुटुंब गरीब होतं, त्यामुळे अनुराधाने अभ्यासासोबत नोकरीही केली.

फोटो - news18 hindi
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. IAS अनुराधा पाल या मुळच्या हरिद्वार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातल्या आहेत. वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कुटुंब गरीब होतं, त्यामुळे अनुराधाने अभ्यासासोबत नोकरीही केली. कोचिंगची फी भरण्यासाठी त्या लहान मुलांना शिकवायच्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा पाल यांनी नवोदय विद्यालय, हरिद्वार येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर गोविंद बल्लभ पंत विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलं. 2008 मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टेक महिंद्रा कंपनीत त्यांची निवड झाली.
अनुराधा यांचे एकच ध्येय होतं ते म्हणजे आयएएस होण्याचे. त्यामुळेच त्यांनी टेक महिंद्राची नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथे तीन वर्षे लेक्चरर म्हणून काम केलं. 2012 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्यांची 451 रँक होती. त्यामुळे त्या आयएएस होऊ शकल्या नाहीत.
अनुराधा पाल यांनी UPSC ची तयारी करणं सोडलं नाही आणि शेवटी 2015 मध्ये त्यांना ऑल इंडिया 62 व्या रँक मिळाला. अशा प्रकारे त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक आव्हानावर मात करता येते हे त्यांनी सिद्ध केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.