‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 06:02 IST2025-10-04T06:01:53+5:302025-10-04T06:02:08+5:30
१७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती.

‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
नवी दिल्ली : नैऋत्य दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेचा माजी अध्यक्ष, स्वयंघोषित बाबा चैतन्यानंद सरस्वती रात्री उशिरा विद्यार्थिनींना त्याच्या खोलीमध्ये येण्यास भाग पाडत होता आणि अनुचित संदेश पाठवत होता. त्याला दिल्लीच्या एका कोर्टाने शुक्रवारी (दि. १४) दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.
पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला पटियाला हाउस कोर्टात न्यायदंडाधिकारी अनिमेष कुमार यांच्यासमोर हजर केले. १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती.
काय आहेत आरोप?
तो फोनवर बसवलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग ॲपद्वारे विद्यार्थिनींच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता. त्याने वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या तपशिलांचा वापर करून अनेक बँक खाती उघडली. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याने ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली.
अनेक बँक खात्यांमधून ८ कोटी रुपये जप्त
त्याच्या वकिलांनी जप्ती मेमो आणि केस डायरीची मागणी करणारा अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाने स्वीकारला. तसेच कपडे, औषधी आणि संन्याशासाठीचे अन्न मागणाऱ्या इतर अर्जांवरही न्यायालयाने पोलिसांकडून उत्तरे मागितली.
चैतन्यानंद (६२) याला २८ सप्टेंबर रोजी आग्रा येथे अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी, पोलिसांनी त्याच्याशी संबंधित अनेक बँक खात्यांमधून आणि मुदत ठेवींमधून ८ कोटी रुपये जप्त केले होते. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट व्हिजिटिंग कार्डदेखील जप्त केले. त्यामध्ये तो संयुक्त राष्ट्र आणि ब्रिक्सशी संबंधित असल्याचे दाखवले गेले.