बाबा रामपालला अखेर अटक
By Admin | Updated: November 19, 2014 21:44 IST2014-11-19T21:27:01+5:302014-11-19T21:44:33+5:30
हरियाणाच्या हिसार जिल्हयातील बरवाला नगर येथील वादग्रस्त बाबा रामपालला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले.

बाबा रामपालला अखेर अटक
ऑनलाइन लोकमत
बरवाला (हिसार), दि. १९ - हरियाणाच्या हिसार जिल्हयातील बरवाला नगर येथील वादग्रस्त बाबा रामपालला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले. ३६ तासांच्या थरारानंतर बाबा रामपालला हिसार पोलिसांनी रात्री साडेनऊच्या सुमारास अटक केली असून रामपालला चंदीगड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी रामपालविरोधात बुधवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होता तसेच आश्रमामध्ये असलेल्या सर्व रामपालच्या हजारो समर्थकांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले होते.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी रामपाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करीत शुक्रवारपर्यंत त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश दिले होते़, मंगळवारी पोलीस रामपाल यांना अटक करण्यासाठी आश्रमात पोहोचले़ मात्र रामपाल समर्थकांनी त्यांना रोखले़ यामुळे तणाव वाढला. पोलीस आणि समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ५ महिला व एका मुलाचा समावेश आहे. पोलीस व समर्थकांमधील धुमश्चक्रीमध्ये शेकडो जण जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यत २७० संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बुधवारी साडेनऊच्या सुमारास बाबा रामपालला अटक केली . अटक केल्यानंतर बाबा रामपालचा चेहरा लपवित त्याला एका अम्ब्यूलन्समध्ये चंदीगडला हलविण्यात आले आहे. हिसारमध्ये रामपालचे समर्थकांनी कोणत्याही प्रकारे हिंसा करू नये यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. ३६ तासांच्या हिंसाचारानंतर बाबा रामपालला अटक करण्यात आल्याने हिसारमध्ये पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.