Ayodhya verdict should not be seen as matter of victory or loss: PM Modi | अयोध्या निकाल : पंतप्रधान मोदींकडून शांतता राखण्याचे आवाहन
अयोध्या निकाल : पंतप्रधान मोदींकडून शांतता राखण्याचे आवाहन

ठळक मुद्देअयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालय आज देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.'अयोध्येचा निकाल येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका.'

नवी दिल्ली - अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालय आज (9 नोव्हेंबर) देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

'अयोध्येचा निकाल येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी' असं ट्वीट मोदींनी केलं आहे. तसेच 'गेल्या काही महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर  निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून दिला जाणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, सद्भावना आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपण सर्वांनी मिळून शांतता राखली पाहिजे' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. 

कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित रामजन्मभूमी विवादाचा निकाल अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला खास या निकालासाठी न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला आहे. न्या. रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर सविस्तर चर्चा केली. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दोन्ही समाजांच्या बैठका घेऊ न निकाल शांततेने मान्य करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मुंबई-दिल्लीतही पोलिसांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करू नका, असे सांगितले आहे.

दोन्ही समाजांच्या प्रमुख नेत्यांच्या तसेच धार्मिक नेत्यांच्या बैठकांमध्ये न्यायालयाच्या निकालानंतर कोणी गुलाल उधळू नये, मिठाई वाटू नये, फटाके उडवू नये वा निषेधही करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. केवळ त्या सूचनांवर अवलंबून न राहता, सर्व शहरांच्या नाक्यानाक्यांवर रेल्वे स्थानके, बस स्थानके, विमानतळे येथे वा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त शुक्रवारी रात्रीपासूनच वाढवण्यात आला आहे.

 

Web Title: Ayodhya verdict should not be seen as matter of victory or loss: PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.