नववर्षानिमित्त अयोध्या अन् वाराणसीत अलोट गर्दी; लाखो भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 21:26 IST2025-01-01T21:25:56+5:302025-01-01T21:26:07+5:30
Ayodhya-Waranasi :रामलला आणि बाबा काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी रांग लावली.

नववर्षानिमित्त अयोध्या अन् वाराणसीत अलोट गर्दी; लाखो भाविकांनी घेतले दर्शन
Ayodhya-Waranasi : नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीराम जन्मभूमी अयोध्या आणि वाराणसीमध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. रामललाच्या दर्शनासाठी तीन लाखांहून अधिक भाविक अयोध्येत पोहोचले, तर वाराणसीतील बाबा काशी विश्वनाथ मंदिरात साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
मंगळवारी सायंकाळपासून दोन लाखांहून अधिक भाविकांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळपर्यंत हा आकडा जवळपास पाच लाखांवर पोहोचला. रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले की, हिवाळ्याच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षामुळे अयोध्येत लाखो भाविक येत आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी रामजन्मभूमी संकुलात 10 अतिरिक्त दर्शन गॅलरी बांधण्यात आल्याने दर्शन लाइनची संख्या 20 झाली आहे. संपूर्ण शहराची सात सुरक्षा विभाग आणि 24 झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. ड्रोन कॅमेरे आणि तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून कडक वाहतूक नियंत्रण ठेवण्यात आले होते.
वाराणसीतील बाबा काशी विश्वनाथ मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी जमू लागली. दुपारी चारपर्यंत साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी गर्भगृहात दर्शन आणि प्रवेशास बंदी घातली होती. शहरातील प्रमुख घाट आणि मंदिरांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. काशी विश्वनाथ मंदिर परिसरात पाच सुरक्षा विभाग आणि 45 ड्युटी पॉइंट तयार करण्यात आले आहेत.