Sugarcane Rate: ऊसदरासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, प्रशासनाची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:46 IST2025-11-04T16:45:18+5:302025-11-04T16:46:21+5:30
आज अथणी बंदची हाक

संग्रहित छाया
अथणी : यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिले बिल ३ हजार ५०० रुपये द्यावे यासाठी गोरलापूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. सोमवारी अलकनूर (ता. रायबाग) येथील शेतकरी लकाप्पा गुणधर (वय २५) यांनी आंदोलनस्थळी विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
आंदोलनस्थळी गुणधर यांनी अचानक विषारी द्रव पिल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना हारुगेरी येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, मागितलेला दर दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असून रात्रं-दिवस आंदोलन सुरू आहे.
पण, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारी आंदोलन चिघळले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गोळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रतिटन ३ हजार २०० रुपये दर देण्याची घोषणा केली, पण शेतकऱ्यांनी हा दर अमान्य केला.
बेळगावचे खासदार, माजी मुख्यमंत्री जगदीश शट्टर यांनीही आंदोलकांची भेट घेतली. सरकार ऊसदरावर तोडगा काढण्यास विलंब करीत असल्याने शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी मागितलेला ३ हजार ५०० रुपये दर रास्त आहे, तो शासन व कारखान्यांनी मान्य करावा, अन्यथा आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीस प्रशासन व कारखाने जबाबदार राहतील. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.
दरम्यान, शेतकरी नेते शशिकांत पडसलगी, चनाप्पा पुजारी, एम. सी. तांबोळी, आदींनी मंगळवारी (दि. ४) अथणी शहर बंदची हाक दिली आहे. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.