निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:15 IST2025-11-19T13:14:53+5:302025-11-19T13:15:51+5:30
देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे.

निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
नवी दिल्ली : काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे. यात माजी न्यायाधीश, निवृत्त सनदी अधिकारी, राजदूत आणि माजी सैन्य अधिकाऱ्यांचासमावेश आहे. या पत्रातून विरोधकांवर जाणीवपूर्वक आयोगाची विश्वासहार्यता धूसर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?
या खुल्या पत्रात एकूण 272 प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले असून त्यात 16 माजी न्यायाधीश, 123 निवृत्त सनदी अधिकारी, 14 माजी राजदूत आणि 133 माजी सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या मते, बिना पुराव्याचे आरोप करून संविधानिक संस्थांना कमजोर करण्याचा एक राजकीय पद्धतशीर प्रयत्न सातत्याने केला जात आहे. भारतीय लोकशाही आज बाहेरील हल्ल्यांमुळे नव्हे, तर विषारी राजकीय वक्तव्यांमुळे मोठ्या आव्हानासमोर उभी असल्याचे यात म्हटले आहे.
272 eminent citizens, consisting of 16 Judges, 123 retired bureaucrats, including 14 Ambassadors, 133 retired armed forces officers, write an open letter condemning the LoP and the Congress Party’s attempts to tarnish constitutional bodies like the Election Commission of India.… pic.twitter.com/lcHnboFV57
— ANI (@ANI) November 19, 2025
विरोधक निवडणूक आयोगाविरोधात पुरावे असण्याचा दावा करतात, परंतु आयोगाकडे कोणतीही औपचारिक तक्रार किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करत नाहीत. यावरुनच हे आरोप निव्वळ राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट होते. पत्रात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अलीकडील विधानांचा उल्लेख आहे, ज्यात त्यांनी निवडणूक आयोगावर “मत चोरी”चा आरोप केला होता. अशा प्रकारचे वक्तव्य अधिकाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते, असेही पत्रात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला BJP ची बी-टीम म्हणणे अयोग्य
आयोगाने SIR ची प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने राबवली आहे. कोर्टाच्या देखरेखीखाली सत्यापन, बनावट मतदार हटवणे आणि नवे पात्र मतदार समाविष्ट करण्याचे काम केले. अशा परिस्थितीत आयोगाला ‘BJP ची बी-टीम’ म्हणणे हे तथ्यांवर नव्हे, तर राजकीय निराशेवर आधारित आरोप असल्याचे पत्रात म्हटले आहे. विरोधक जिंकल्यावर आयोगाचे कौतुक करतात आणि हरल्यावर आरोप करततात, हा सेलेक्टिव आक्रोश आणि राजकीय संधीवाद स्पष्ट दर्शवतो, अशी बोचरी टीकाही पत्रात केली आहे.