मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार

By Admin | Updated: June 7, 2015 23:04 IST2015-06-07T23:04:12+5:302015-06-07T23:04:12+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

The attacks on the Modi government will further intensify | मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार

मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ५६ दिवसांच्या ‘आत्मचिंतन’ सुटीवरून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी वारंवार आक्रमकतेचा परिचय दिला आहे.
राहुल गांधी यांनी भूसंपादन विधेयक ते रियल इस्टेट विधेयकासारख्या मुद्यांवर रालोआ सरकारची नाकेबंदी केली असताना हे मुख्यमंत्र्यांचे संमेलन होत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणींचे मुद्दे समोर करीत ते पुन्हा एकदा ‘सूट-बूट की सरकार’वर शरसंधान करतील, अशी चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, नेट न्यूट्रॅलिटी, आयआयटी-मद्रासमधील दलित विद्यार्थी संघटनेची रद्द झालेली मान्यता यासारख्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते. (वृत्तसंस्था)

> मेमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा जबर धक्का बसल्यानंतर आणि दिल्लीसारख्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर होत असलेले हे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे पहिले संमेलन आहे.
> सध्या काँग्रेसकडे अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोरम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या राज्यांमध्ये सत्ता आहे. आसाम आणि केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीच्या डावपेचांवरही चर्चा होऊ शकते.

> सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये पक्षाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या संमेलनाची परंपरा सुरू केली आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसकडे सत्ता नव्हती. माऊंट अबू, गुवाहाटी, दिल्ली आणि श्रीनगर येथे काँग्रेसची संमेलने झाली आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका आणि राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड लांबणीवर पडली असताना हे संमेलन होत आहे. जानेवारी २०१३ मध्ये जयपूर येथील चिंतन शिबिरात राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
———-
पक्षाध्यक्षपदी निवड कधी?
राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी आणि अ. भा. काँग्रेस समितीची बैठक कधी होणार, याबाबत पक्षनेतृत्वाने मौन पाळले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही बैठका होऊ शकतात, असे एका गटाला वाटते. राहुल गांधी लवकरच पक्षाध्यक्ष बनणार हा संदेश मुख्यमंत्र्यांच्या संमेलनातून दिला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले.

Web Title: The attacks on the Modi government will further intensify