‘लोकशाहीवरचा हल्ला भारतासाठी सर्वांत मोठा धोका’; कोलंबियात राहुल गांधींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:54 IST2025-10-03T12:52:39+5:302025-10-03T12:54:41+5:30
लोकशाहीवरचा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयएए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

‘लोकशाहीवरचा हल्ला भारतासाठी सर्वांत मोठा धोका’; कोलंबियात राहुल गांधींचे मोठे विधान
कोलंबिया : लोकशाहीवरचा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयएए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही प्रणाली ही प्रत्येकाला आपले स्थान देते. पण, सध्या या लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूंनी हल्ला होत आहे, अशीही टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, सध्या भारतात लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. विविध परंपरांना फुलण्यास वाव देणे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपण चीनप्रमाणे लोकांना दडपून ठेवू शकत नाही. हुकूमशाही पद्धतीने देश चालवू शकत नाही. चीनच्या तुलनेत भारताची रचना खूपच गुंतागुंतीची आहे. भारताची ताकद ही चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भारताला आध्यात्मिक परंपरा आणि विचारप्रणाली आहे. परंपरा आणि विचारशैलीच्या बाबतीत भारताकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे. मी माझ्या देशाबद्दल खूप आशावादी आहे. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. विविध कल्पना, परंपरा आणि धर्म यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी हवी असलेली मोकळीक सध्या देशात फारशी मिळताना दिसत नाही.
‘देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची व तेथील लोकशाहीची प्रतिमा मलिन करत आहेत. कधी ते भारतीय राज्यव्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याची भाषा करतात, तर कधी ते लष्कर, न्याययंत्रणा, संविधान, सनातन धर्म यांच्यावर टीका करतात.
दोन देशांच्या संघर्षाच्या भारताला झळा
दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कोलंबियातील सिनेटचे अध्यक्ष लिडिओ ग्रासिया यांचीही भेट घेतली. कोलंबियाला दिलेली भेट ही त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील चार देशांच्या दौऱ्याचा एक भाग आहे.
भारत चीनचा शेजारी आहे आणि अमेरिकेशीही त्याचे उत्तम संबंध आहेत. या दोन देशांच्या संघर्षाच्या झळा भारतालाही बसतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून ध्रुवीकरणाचे प्रयत्न चालविले आहेत.
भारतात अर्थव्यवस्थेची वाढ होऊनही आपण नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. याचे कारण आपली अर्थव्यवस्था मुख्यतः सेवाक्षेत्रावर आधारित आहे. त्यामुळे भारताला उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे.