Assam Flood: आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, काँग्रेसचा केंद्रावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:06 IST2022-05-24T16:06:21+5:302022-05-24T16:06:28+5:30
Assam Flood: राज्यातील 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.

Assam Flood: आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, काँग्रेसचा केंद्रावर आरोप
Death In Assam Flood: आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून साडे 7 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 25 लोकांपैकी 20 लोक पुरामुळे तर 5 लोकांचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे. शेजारील राज्यांनाही पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे.
काँग्रेसचा केंद्रावर आरोप
रिपोर्टनुसार, राज्यातील नागाव परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 3.5 लाख लोक संकटाचा सामना करत आहेत. सध्या राज्यात 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दरम्यान, या परिस्थितीवरुन काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. भाजप सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मिळणाऱ्या मदत रकमेपासून आसामला वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आसामला निधीपासून वंचित ठेवले
आसाममध्ये काँग्रेस नेते मनजीत महंता यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, एनडीआरएफ अंतर्गत गुजरातला 2021-22 मध्ये एक हजार कोटी रुपये मिळाले, पण आसामला एक पैसाही दिला गेला नाही. भाजपच्या कार्यकाळात 2018-19 आणि 2019-20 या वर्षात केंद्राकडून आसामला काहीही दिले गेले नाही. 2020-21 मध्ये आसामला केवळ 44.37 कोटी रुपये मिळाले, अशी टीका त्यांनी केली.
रेल्वेनेही गाड्या रद्द केल्या
आसाममध्ये संततधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेने राज्यातील गाड्या रद्द केल्या आहेत. आसाममध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वेने जून महिन्यापर्यंत गाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग विभागात पाणी साचल्याने आणि दरड कोसळल्यामुळेही हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या शेजारील राज्यांतील रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे तुटला आहे.