'काँग्रेसने तेच गाणे गायले, जे पाकिस्तानने लिहिले..', पीएम मोदींची असाममधून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:34 IST2026-04-06T15:34:04+5:302026-04-06T15:34:32+5:30
Assam Assembly Election: 'काँग्रेसने नेहमी शत्रूंच्या अजेंड्याला हवा दिली.'

'काँग्रेसने तेच गाणे गायले, जे पाकिस्तानने लिहिले..', पीएम मोदींची असाममधून टीका
Assam Assembly Election: असाममधील बारपेटा येथे निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष सैन्याच्या शौर्याचा अपमान करतो आणि त्यांच्या नेत्यांचा पाकिस्तानशी संबंध देशासाठी घातक ठरतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
काँग्रेसने नेहमी शत्रूंच्या अजेंड्याला हवा दिली
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष मोदींना कमी दाखवण्यासाठी भारतीय सैन्याच्या शौर्यालाही कमी लेखतो. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकच्या वेळीही काँग्रेसने सरकार आणि सैन्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सैन्याने काही तासांत पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले, पण काँग्रेसने पाकिस्तानला आवडेल अशीच भूमिका घेतली. काँग्रेसने तेच गाणे गायले, जे पाकिस्तानने लिहिले.
वन रँक वन पेन्शनवरूनही टीका
पंतप्रधान मोदी यांनी वन रँक वन पेन्शन (OROP) मुद्द्यावरूनही काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने अनेक वर्षे ही योजना लागू केली नाही आणि सैन्याशी विश्वासघात केला. काँग्रेसने फक्त आश्वासन दिले, पण आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शन योजना लागू करून माजी सैनिकांना फायदा दिला.
घुसखोरांच्या मुद्द्यावर काँग्रेसवर आरोप
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर घुसखोरांना समर्थन देत असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, काँग्रेस अवैध कब्जाविरोधातील कारवाईला विरोध करते आणि भविष्यात असा कायदा करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे ‘घुसखोर’ हा शब्द वापरणाऱ्यांनाही शिक्षा होऊ शकते. सभेत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी दीर्घकालीन योजना राबवत आहे आणि शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जात आहे. भाजपा आणि एनडीए हे शेतकऱ्यांची पहिली पसंती बनले आहेत, असेही पीएम मोदी म्हणाले.