Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:01 IST2026-04-15T16:51:24+5:302026-04-15T17:01:12+5:30

खासदार राघव चड्डांना यांना बाजूला करत आम आदमी पार्टीने खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेत उपनेता म्हणून नियुक्ती केली. याच अशोक मित्तल यांच्या मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्या. 

Ashok Mittal: ED raids the properties of the same leader who removed Raghav Chadha and made him Rajya Sabha Deputy Leader | Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी

Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी

आम आदमी पार्टीने खासदार राघव चड्डा यांना हटवून अशोक मित्तल यांना राज्यसभेत उपनेता केले, त्यांच्याच मालमत्तांवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने धाडी टाकल्या आहेत. राज्यसभेचे खासदार असलेले अशोक मित्तल हे लवली प्रोफेशनल विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत. ईडीच्या पथकांनी बुधवारी (१५ एप्रिल) एकाच वेळी गुरुग्राम, जालंधर आणि पंजाबमध्ये असलेल्या इतर ८ ते ९ ठिकाणांवर धाडी टाकल्या. 

लवली प्रोफेशनल विद्यापीठाच्या निधीमध्ये गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात या धाडी टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पण, ही कारवाई राजकीय सूडातून सुरू असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

राघव चड्डांना हटवले, मित्तल यांना बढती

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम आदमी पार्टीने खासदार राघव चड्डा यांना राज्यसभा उपनेता पदावरून हटवले. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्त करण्यात आली. हा बद्दल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

ईडीच्या पथकाने खासदार अशोक मित्तल यांच्या पंजाबमधील घरीही धाड टाकली. जालंधरमध्ये असलेल्या लवली प्रोफेशनल विद्यापीठाचे ते मालक आहेत. विद्यापीठातही पथके गेली होती, अशीही माहिती समोर आली आहे. 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र 

ईडीच्या कारवाईवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी टीकास्त्र डागले. 'एक्स'वर पोस्ट करत ते म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नेहमीची मोदी स्टाईल म्हणजे ही धाड आहे", असे म्हणत त्यांनी एक शेर पोस्ट केला आहे. "लेकिन हम वो पत्ते नहीं जो शाख से टूटकर गिर जाएं, आंधियों को कहो औकात में रहें", असे मुख्यमंत्री मान म्हणाले. 

खासदार अशोक मित्तल कोण आहेत?

अशोक मित्तल यांचा राजकारणातील प्रवेश २०२२ मध्ये झाला. याच वर्षी ते राज्यसभेचे खासदार बनले. त्यांनी संसदेच्या अनेक समित्यांमध्ये काम केले आहे. विशेषतः संरक्षण आणि अर्थ समित्यांचे काम त्यांनी केले. 

भारतीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून त्यांना परदेशातही पाठवण्यात आले होते. अशोक मित्तल यांच्या वडिलांनी बलदेव राज मित्तल यांनी १९६१ मध्ये ५०० रुपये कर्ज घेऊन जालंधर छावणी भागात एक मिठाईचे दुकान सुरू केले होते. 

१९८४ मध्ये अशोक मित्तल यांनी वडिलांच्या व्यवसायात पाऊल ठेवले. २००१ मध्ये त्यांनी फगवाडामध्ये ३.५ हेक्टर जमीन घेतली आणि महाविद्यालयाची स्थापना केली. २००५ मध्ये लवली महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. आता तेच लवली प्रोफेशनल विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. 

Web Title : राज्यसभा में पदोन्नति के बाद आप के अशोक मित्तल पर ईडी का छापा

Web Summary : राज्यसभा में पदोन्नत होने के बाद ईडी ने आप के अशोक मित्तल पर लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी से जुड़े मनी लॉन्ड्रिंग जांच के बीच छापा मारा। यह कार्रवाई राघव चड्ढा को बदलने के बाद हुई। पंजाब के सीएम ने इसे बीजेपी की राजनीतिक चाल बताया।

Web Title : ED raids on AAP's Ashok Mittal after Rajya Sabha promotion

Web Summary : ED raided AAP's Ashok Mittal, recently promoted in Rajya Sabha, amid money laundering probes linked to Lovely Professional University. The action follows his replacing Raghav Chadha. Punjab CM calls it BJP's political move.