आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 16:41 IST2018-06-25T16:37:18+5:302018-06-25T16:41:21+5:30
आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जेटलींची फेसबुक पोस्ट

आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना
नवी दिल्ली : इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्यावेळी माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधनं लादण्यात आली होती. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. यावरुन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी केली आहे.
जेटली यांनी आणीबाणीच्या निमित्तानं फेसबुक पोस्टमधून इंदिरा गांधींवर निशाणा साधला आहे. हिटलर आणि इंदिरा गांधी या दोघांनीही घटनेच्या चिंधड्या उडवल्या होत्या, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'त्या दोघांनीही (हिटलर आणि इंदिरा गांधींनी) लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या घटनेचं रुपांतर हुकूमशाहीच्या घटनेत केलं. हिटलरनं संसदेतील बहुसंख्य विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबलं होतं. आपलं अल्पमतात गेलेलं सरकार हिटलरनं आणीबाणीचा आधार घेऊन दोन तृतीयांश मतांनी वाचवलं होतं,' असं जेटलींनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कृती हिटलरसारखीच होती, असं जेटलींनी त्यांच्या पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. 'इंदिरा गांधींनीदेखील विरोधी पक्षातील बहुसंख्य नेत्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी या नेत्यांच्या अनुपस्थितीत संसदेत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध केलं आणि घटनेत अनेक बदल केले. यामुळे उच्च न्यायालयाचा पुनर्विचार याचिका दाखल केल्याचा अधिकार काढून घेण्यात आला,' असं जेटली यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या घटनेचा आत्माच या बदलांमुळे संपुष्टात आला. याशिवाय इंदिरा गांधींनी कलम 368 मध्येही बदल केला. त्यामुळे संविधानात केलेले बदल न्यायपालिकेच्या कक्षेतून दूर गेले,' असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.