Article 370:Internet And Telecom Services Restored In Jammu And Kashmir Situation Also Improving | कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले 
कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले 

श्रीनगर - कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट, फोन सेवांवर निर्बंध लावण्यात आले होते. हळूहळू या सेवांवरील निर्बंध हटविण्यात येत आहेत. सोमवारपासून राज्यातील शाळा-कॉलेज उघडण्यात येणार आहेत. तर आजपासून इंटरनेट, फोनसेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमध्ये 2 जी सेवा सुरु करण्यात आली आहे. तर काश्मीरमध्ये लँडलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी याबाबतीत संकेत दिले होते. 

काश्मीरात 17 लँडलाइन सेवा शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे. राज्यातील 100 हून टेलिफोन एक्सचेंज सेवांमधील 17 ऑपरेटर्सना सुविधा सुरु करण्याची सूट दिली आहे. श्रीनगर जिल्हा, सिव्हिल लाइन्स, छावणी परिसर, विमानतळाजवळील सेवा सुरु करण्यात आली आहे. उत्तर काश्मीरात गुरेज, तंगमार्ग, उरी केरन, करनाह आणि तंगधार येथील सेवा सुरु करण्यात आली आहे. तर दक्षिण काश्मीरात काजीगुंड आणि पहलगाम या परिसरात फोन सेवा सुरु केली आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्टला कलम 370 हटविणे आणि जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक मांडल्यापासून याठिकाणची मोबाईल आणि लँडलाइन फोन सेवा स्थगित करण्यात आली होती. 

काश्मीरातील 5 जिल्ह्यांवर आजही बंदी 
काश्मीरातील सुरक्षेचा विचार करता अद्याप 5 जिल्ह्यांमधील या सेवांवर बंदी कायम ठेवली आहे. त्याचसोबत सीआरपीएफ, जम्मू काश्मीर पोलीस, सैन्याचे जवान यांना अतिसंवेदनशील परिसरात तैनात ठेवण्यात आलं आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुख्य सचिव सुब्रमण्यम यांनी काश्मीर खोऱ्यात फोन सेवा शनिवारपासून सुरु करण्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यात परिस्थिती सर्वसामान्य असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 

उधमपूरपासून जम्मूपर्यंत इंटरनेट सेवा सुरु 
शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरातील उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा आणि जम्मू शहरांतील 2 जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचसोबत या परिसरात कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय कायदा-सुव्यवस्था परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे त्यांची सुटकाही परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.  

Web Title: Article 370:Internet And Telecom Services Restored In Jammu And Kashmir Situation Also Improving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.