भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:01 IST2022-12-09T11:50:31+5:302022-12-09T12:01:17+5:30

लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.

Around 60 people injured after a house caught fire during a wedding in Bhungra village | भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले

भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू; नवरदेवासह 60 जण होरपळले

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जोधपूरमध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 60 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ झाला. तर मंडपात असलेले लोक आगीत होरपळले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. 

भूंगराचे रहिवासी असलेले सगत सिंह गोगादेव यांच्या मुलाचं गुरुवारी लग्न होतं. संध्याकाळी वरात येणार होती. त्यासाठी घरामध्ये पाहुणेमंडळी देखील होते. नातेवाईकांसाठी खास मेजवाणीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान सिंलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. काही लोक गंभीररित्या होरपळले आहेत. 

सिलिंडर स्फोटमुळे घराचे छतही कोसळले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लग्नसोहळा सुरू असताना लग्नाच्या मंडपात पाहुणेमंडळी होती. यावेळी लग्नाच्या जेवणासाठी लावलेला सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. एकूण पाच सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजते. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळही झाला. जखमींमध्ये नवरदेव आणि त्याच्या वडिलांचासुद्धा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Around 60 people injured after a house caught fire during a wedding in Bhungra village