फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:21 IST2025-12-01T06:19:31+5:302025-12-01T06:21:48+5:30
वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय असेल तेव्हाच अॅप काम करेल अन्यथा अॅप तात्काळ बंद होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला आळा बसेल असे सरकारने म्हटले आहे.

फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या अॅप-आधारित कम्युनिकेशन अॅप्सना 'सिम लिंक' करणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय असेल तेव्हाच अॅप काम करेल अन्यथा अॅप तात्काळ बंद होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला आळा बसेल असे सरकारने म्हटले आहे. दूरसंचार विभागाने अधिसूचना जारी करत अॅप-बेस्ड अॅप्सना निर्देश दिले आहेत.
नवीन नियम काय आहेत?
फोनमध्ये तेच सिम नसले तर अॅप बंद: व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्राम, शेअरचॅट, जिओचॅट, स्नॅपचॅट यांसारख्या अॅप्सना सतत तपासावे लागेल की नोंदणीकृत नंबरचे सिम फोनमध्ये आहे का. सिम नसल्यास अॅप बंद करणे बंधनकारक.
वेब आवृत्त्यांसाठी कडक नियम
व्हॉट्सअॅप वेब, टेलिग्राम वेब यांसारख्या वेब सेवांना प्रत्येक ६ तासांनी स्वयंचलित लॉगआऊट करावे लागेल. यामुळे वापरकर्त्यांना पुन्हा-पुन्हा स्वतःची ओळख पडताळावी लागणार आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी हे आवश्यक आहे.
का आणले 'सिम लिंक'चे नियम ?
परदेशातून येणाऱ्या सायबर फसवणूक कॉल/मेसेंजबद्दल वाढता धोका
अॅप्सचा वापर करून ओटीपी, ओळख आणि नंबर लपवणे शक्य
टेलिकॉम आयडेंटिफायरचा गैरवापर
वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी सिस्टीम मजबूत करणे
नियम न पाळल्यास कडक कारवाई
नवीन निर्देशांचे पालन न केल्यास अॅप-बेस्ड सेवांवर दूरसंचार अधिनियम २०२३, टेलिकॉम सायबर सिक्युरिटी नियम, तसेच इतर कायद्यांनुसार कारवाई होणार आहे.
सरकारने काय म्हटले?
फोनमध्ये सिम नसतानाही चालणाऱ्या अॅप्सचा वापर देशाबाहेरून होत असलेल्या सायबर फसवणुकीत वाढ आहे. टेलिकॉम सायबर सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रमुख अॅप कंपन्यांसोबत चर्चा सुरू होत पण, सायबर धोका गंभीर असल्याने औपचारिक आदेश देणे आवश्यक झाले आहे.
कशामुळे कारवाई? : अनेक अॅप्स
सिम कार्ड डिव्हाइसमध्ये नसतानाही सेवा देत आहेत. या फीचरचा विदेशातृ होणाऱ्या सायबर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत होता.