"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:42 IST2025-05-06T13:41:33+5:302025-05-06T13:42:26+5:30

Pahalgam Terror Attack : राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

anjum tanveer appeal pm modi for pregnant pakistani wife pahalgam terror attack | "आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांचंही नुकसान होत आहे. भारताने पाकिस्तानी व्हिसावर राहणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नागरिक भारत सोडून गेले आहेत. राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

एएनआयशी बोलताना राजौरी येथील अंजुम तनवीर म्हणाला की, "माझं लग्न २०२० मध्ये झालं. माझी पत्नी कायदेशीररित्या व्हिसावर राहते. आम्ही दरवर्षी व्हिसासाठी अर्ज करायचो आणि तो वाढवला जात असे. पण यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घातली आहे. माझी पत्नी पाकिस्तानात गेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हालाही दुःख झालं आहे." 

"सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा"

"आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आम्ही नेहमीच सैन्याला सहकार्य करत असतो.  जर सरकारने आम्हाला सैन्यात भरती केलं तर आम्ही बॉर्डरवर लढू." आपल्या गर्भवती पत्नीचा उल्लेख करताना तन्वीर म्हणाला, “सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. जे बेकायदेशीरपणे राहत होते त्यांच्यासाठी हे ठीक आहे, परंतु ज्यांचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे. माझी मुलगी रडत आहे आणि ती आजारी आहे. मला खूप त्रास होत आहे."

"आम्ही भारताचं मीठ खाल्लं"

"जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध लढायचं असेल तर ते करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कुटुंबातील एका सदस्याशिवाय पाकिस्तानशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही भारताचं मीठ खाल्लं आहे, आम्ही दुसऱ्या कोणाच्या बाजूने कसे असू शकतो? सरकारने याचा विचार करावा. माझी पत्नी गर्भवती आहे, जर काही झालं तर ती सरकारची चूक असेल." जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.  
 

Web Title: anjum tanveer appeal pm modi for pregnant pakistani wife pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.