आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दोन मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळेच बंगळुरूकडे जाणाऱ्या या बसला आग लागल्याचे या तपासातून समोर आले आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला होता.
हा अपघा कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरू गावाजवळ घडला. या अपघातात एक दुचाकी बसखाली आली आणि काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळे तिचा इंधन टँक फुटला आणि बसने पेट घेतला. बसमधील ४४ प्रवाशांपैकी १९ जणांचा जळून मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांना बसबाहेर पडण्यात यश आले होते.
काय म्हणाले डीआयजी?कुर्नूल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कोया प्रवीण पीटीआयसोबत बोलतना म्हणाले, "आम्हाला नुकतीच फॉरेन्सिक पुष्टी मिळाली आहे की, दुचाकीस्वार दोन्ही व्यक्ती (शिव शंकर आणि एरी स्वामी) नशेत होते." महत्वाचे म्हणजे, पोलिसांना हे माहीत होते. पण, पोलीस या वस्तुस्थितीची फॉरेन्सिक पुष्टी होण्याची वाट पाहत होते, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजता शंकर आणि एरी स्वामी हे लक्ष्मीपुरम गावातून तुग्गली गावाकडे जात होते. प्रवासादरम्यान दोघांनी एका ढाब्यावर जेवण केले होते. जेथे स्वामीने दारू प्याल्याचे कबूल केले आहे.
नशेत असताना अपघात -कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल भरल्यानंतर शंकर बेपर्वाईने दुचाकी चालवत होता. थोड्याच वेळात त्यांची दुचाकी घसरली आणि शंकर उजव्या बाजूला पडून डिव्हाईडरला धडकला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
...अन् बसने पेट घेतला -शंकरचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर स्वामी दुचाकी रस्त्यावरून बाजूला करण्याच्या विचारात असतानाच, मागून येणारी भरधाव बस दुचाकीवरून गेली. तिच्यासोबत ती दुचाकीही काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळेच बसने पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर भयभीत झालेला स्वामी तेथून पळून गेला. या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.