हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:24 IST2025-05-21T11:23:28+5:302025-05-21T11:24:09+5:30
कारमध्ये अडकून चार मुलांचा मृत्यू झाला. मुलं खेळताना पार्क केलेल्या कारमध्ये बसली. यावेळी कारचा दरवाजा आपोआप लॉक झाला आणि आतमध्ये गुदमरून मुलांचा मृत्यू झाला.

हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील द्वारपुडी गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. कारमध्ये अडकून चार मुलांचा मृत्यू झाला. मुलं खेळताना पार्क केलेल्या कारमध्ये बसली. यावेळी कारचा दरवाजा आपोआप लॉक झाला आणि आतमध्ये गुदमरून मुलांचा मृत्यू झाला. मुलं एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कारचे दरवाजे आधी उघडे होते. मुलं खेळता खेळता कारमध्ये गेली, पण मुलं आत गेल्यानंतर कारचे दरवाजे आपोआप लॉक झाले. अडकवल्यावर लहान मुलं आतून ओरडत राहिली पण कारच्या खिडक्या बंद असल्याने त्यांचा आवाज बाहेर जात नव्हता. संध्याकाळपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिलं नाही.
बराच वेळ झाल्यावर मुलांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा मुलं कुठेच सापडली नाहीत. परिसरात एकच गोंधळ उडाला. ही कार लग्नाला आलेल्या एका नातेवाईकाची होती. जेव्हा त्यांना मुलं सापडली नाहीत तेव्हा ते आपल्या कारने पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाले. कार उघडताच त्यांना धक्का बसला, त्यांना मुलं बेशुद्ध अवस्थेत दिसली.
मुलांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की, सहा तास आधी मुलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. कारमध्ये मुलं अडकल्यानंतर घाबरली असतील. उष्णतेमुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.