...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:58 IST2025-11-09T16:58:09+5:302025-11-09T16:58:55+5:30
प्रतापगढमध्ये ड्रग माफिया राजेश मिश्राच्या ठिकाण्यावर UP पोलिसांनी छापा टाकून ₹२.०१ कोटी रोख रक्कम आणि स्मैक-गांजा जप्त केला. जेलमधून चालणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश. यूपी पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी रोख जप्ती.

...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रतापगढ जिल्ह्यात ड्रग माफियाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मानिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी कारागृहातूनच अंमली पदार्थांचे अवैध जाळे चालवत होती. या छापेमारीत पोलिसांनी ₹२.०१ कोटी रोख रक्कम, ६.०७५ किलो गांजा आणि ५७७ ग्रॅम स्मैक (हेरोईन) जप्त केली आहे.
जप्त केलेल्या ₹२.०१ कोटी रोख रकमेची मोजणी करण्यासाठी पोलिसांना तब्बल २२ तास लागले. ही रक्कम तशी छोटी असली तरी सर्व १०,२०, ५० रुपयांच्याच नोटा होत्या. एवढ्या चुरगळलेल्या, पुड्या बांधलेल्या होत्या की त्या मशीनमध्ये देखील मोजता येत नव्हत्या. यामुळे आणखी पोलीस बोलवून माफियाच्या घरातच ते मोजण्यासाठी बसले. यामुळे मोजता मोजता पोलिसांच्या नाकीनऊ आले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या इतिहासातील ड्रग्ज प्रकरणात जप्त केलेली ही सर्वात मोठी रोख रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे.
जप्त केलेल्या अंमली पदार्थांसह एकूण जप्तीची किंमत सुमारे ₹३ कोटी इतकी आहे. पोलीस अधीक्षक दीपक भूकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारागृहात बंद असलेला कुख्यात तस्कर राजेश मिश्रा याच्या ठिकाण्यावर छापा टाकण्यात आला. राजेश मिश्रा याची पत्नी रीना मिश्रा, मुलगा विनायक मिश्रा, मुलगी कोमल मिश्रा, तसेच नातेवाईक अजित कुमार मिश्रा आणि यश मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या टोळीने बनावट जामीन आणि कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यासारखे मोठे खुलासे केले आहेत.