अधुरी एक कहाणी! ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच जात-पात आणि अहंकाराने घेतले दोन बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:21 IST2026-02-15T14:20:44+5:302026-02-15T14:21:16+5:30
Noida Crime News: शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेमाचा दिवस असलेला व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना नोएडामध्ये एका बंद कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली.

अधुरी एक कहाणी! ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच जात-पात आणि अहंकाराने घेतले दोन बळी
शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेमाचा दिवस असलेला व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना नोएडामध्ये एका बंद कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली. नोएडामधील सेक्टर-३९ मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पांढऱ्या कारमध्ये सापडलेले हे मृतदेह क्रिकेटपटू सुमित आणि त्यांची प्रेयसी रेखा यांचे होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर जी काही माहिती समोर आली धक्कादायक होती. जात-पात आणि अंहकारामुळे या प्रेमी युगुलाचा बळी गेला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुमित आणि रेखा यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात दिल्लीमधील त्रिलोकपुरी येथील एका सरकारी शाळेमधून झाली होती. शालेय जीवनात दोघांमध्ये असलेली मैत्री हळुहळू प्रेमात बदलली होती. दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना ओळखायचे. तसेच सुमित आणि रेखा यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. एवढंच नाही तर सुमित एक उत्कृष्ट क्रिकेटपटूही होता. दरम्यान, पदवी मिळवल्यावर रेखाने नोकरी करण्यास सुरुवात केली. तर सुमितने वडिलांच्या मदतीने एक वॉटर प्लँट सुरू केला होता. तसेच रेखाला भेट देण्यासाठी नोएडामध्ये एक कोटी रुपयांचा एक फ्लॅटसुद्धा खरेदी केला होता.
मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. २०१९ मध्ये सुमितचा भीषण अपघात झाला. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या सुमितची रेखाने मनापासून काळजी घेतली. तसेच यादरम्यान या दोघांमधील प्रेमसंबंधांची कुणकूण दोघांच्याही कुटुंबीयांना लागली. सुमितच्या कुटुंबीयांची या नात्याला मान्यता होता. मात्र रेखाचं कुटुंबं विरोधात होतं. त्याचं कारण म्हणजे सुमित वाल्मिकी समाजातील होता. तर रेखा कायस्थ होती. त्यानंतर रेखाच्या कुटुंबीयांनी ,सुमितला धमकावण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, २०२५ मध्ये रेखाच्या चुलत भावाने सुमितला पकडून त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा सुमितने लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली आहे. रेखाशी माझा काही संबंध नाही. जर मी तिची छेड काढली किंवा तिला त्रास दिला तर माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे सुमितने लिहिलेले होते. त्याबरोबरच सुमितचं रेखाच्या कुटुंबीयांसोबत झालेलं सोशल मीडिया चॅटही समोर आलं आहे.
यादरम्यान, सुमित आणि रेखा यांनी भेटीगाठी कमी केल्या. मात्र त्यांच्या मनातील प्रेमभावना कायम होती. अखेर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमित त्याच्याकडील कारमधून निघाला. तसेच मी मरायला निघालो आहे, असा मेसेज त्याने केला. घाबरलेल्या रेखाने त्याला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले. त्यानंतर दोघेही कारमधून निघाले. मात्र इकडे संध्याकाळ झाली तरी रेखा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी सेक्टर-३९ पोलिसांना एक बेवारस कार उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा कारच्या काचा बंद असल्याचे दिसले. पोलिसांनी जेव्हा कारच्या काचा तोडून आत पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला. कारमध्ये एक तरुण आणि तरुणी असे दोघांचे मृतदेह पडलेले होते. हे मृतदेह सुमित आणि रेखा यांचे होते. दोघांच्याही डोक्यात गोळ्या झाडलेल्या होत्या. तसेच सुमितच्या हातात पिस्तूल होती. त्यावरून सुमितने आधी रेखावर गोळी झाडून नंतर स्वत: जीवन संपवल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आता पुढील तपास सुरू आहे.