भारतातील ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; एअर इंडियाची विमाने तांत्रिकदृष्ट्या नापास; सरकारची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:13 IST2026-02-06T15:04:48+5:302026-02-06T15:13:50+5:30

भारताच्या विमान वाहतूक नियामकाने केलेल्या ऑडिटमध्ये अर्ध्या विमानांमध्ये दोष आढळून आले आहेत.

An audit by India aviation regulator found defects in half of the aircraft inspected | भारतातील ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; एअर इंडियाची विमाने तांत्रिकदृष्ट्या नापास; सरकारची आकडेवारी

भारतातील ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; एअर इंडियाची विमाने तांत्रिकदृष्ट्या नापास; सरकारची आकडेवारी

Aircraft Audits:  तुम्ही वारंवार विमानाने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. भारतीय विमान कंपन्यांच्या तांत्रिक तपासणीचा एक धक्कादायक अहवाल गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आला. या आकडेवारीनुसार, भारतातील निम्म्या विमानांमध्ये रिपिटिटिव्ह डिफेक्ट्स म्हणजेच वारंवार उद्भवणारे तांत्रिक दोष आढळले आहेत. यात देशातील नामांकित मानल्या जाणाऱ्या एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांची स्थिती सर्वात खालावलेली असल्याचं समोर आलं आहे.

काय सांगते सरकारची आकडेवारी?

नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत दिलेल्या लेखी माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून एकूण ६ एअरलाईन्सच्या ७५४ विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल ३७७ विमानांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

एअर इंडियाच्या ७२ टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड

एअर इंडिया ग्रुपच्या ताफ्यातील विमानांची जेव्हा तपासणी झाली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. जर आपण १० विमानांची निवड केली, तर त्यापैकी सुमारे ७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचे दिसून आले आहे. या कंपनीची एकूण १६६ विमाने तपासली गेली, त्यापैकी १३७ विमानांत दोष आढळले. म्हणजेच ८० टक्क्यांहून अधिक विमाने तांत्रिकदृष्ट्या सतावणारी आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनीची १०१ विमाने तपासली, त्यापैकी ५४ विमानांत सारखे बिघाड होत आहेत. दोन्ही कंपन्यांच्या मिळून ७२ टक्के विमानांमध्ये तांत्रिक समस्या आहेत.

एअर इंडियाचे म्हणणे काय? 

कंपनी म्हणते की, हे दोष म्हणजे इंजिन फेल होणे किंवा मोठे धोके नाहीत, तर प्रवाशांच्या सीट खराब असणे, समोरचा स्क्रीन न चालणे किंवा जेवणाचे टेबल तुटलेले असणे अशा गोष्टी आहेत. मात्र, ७२ टक्के हा आकडा प्रवासी सुविधेच्या दृष्टीने खूप मोठा मानला जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "आम्ही खबरदारी म्हणून स्वतःहून मोठ्या प्रमाणावर तपासणी केली, त्यामुळे ही संख्या मोठी दिसत आहे."


इतर विमान कंपन्यांची स्थिती 

इंडिगो: इंडिगोच्या तपासलेल्या प्रत्येक ३ विमानांमागे एका विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे आढळले आहे. एकूण ४०५ विमानांपैकी १४८ विमानांमध्ये वारंवार समस्या येत आहेत.

स्पाइसजेट : या कंपनीची स्थितीही चिंताजनक आहे. तपासलेल्या ४३ विमानांपैकी १६ विमानांमध्ये तांत्रिक दोष आहेत. म्हणजेच दर ५ पैकी साधारण २ विमानांत बिघाड आहे.

अकासा एअर: ही नवीन कंपनी असली तरी त्यांच्या ३२ पैकी १४ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. म्हणजेच जवळपास अर्धा ताफा तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे.

डीजीसीएकडून तपासणीत वाढ

विमानांमधील वाढत्या तांत्रिक तक्रारींची दखल घेत विमान वाहतूक नियामक संस्थेने आपली कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरात ३,८९० सर्व्हिलन्स इन्स्पेक्शन आणि ५५० नाईट इन्स्पेक्शन करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी डीजीसीएने आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या ६३७ वरून वाढवून १०६३ केली आहे. वारंवार विमाने हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याच्या बातम्या येत असतानाच, संसदेत सादर झालेली ही अधिकृत आकडेवारी प्रवाशांच्या मनात धडकी भरवणारी ठरत आहे.

Web Title : भारत में 50% विमानों में तकनीकी खराबी; एयर इंडिया ऑडिट में विफल

Web Summary : एक सरकारी रिपोर्ट से पता चला है कि भारत के आधे विमानों में बार-बार तकनीकी खराबी आ रही है। एयर इंडिया और इंडिगो का रिकॉर्ड सबसे खराब है। एयर इंडिया के 72% विमानों में बार-बार समस्याएँ आ रही हैं, हालाँकि एयरलाइन गंभीरता को कम आंकती है।

Web Title : Technical Snags Plague 50% of Indian Planes; Air India Fails Audit

Web Summary : Half of Indian planes have repetitive technical defects, a government report reveals. Air India and Indigo have the worst records. 72% of Air India's fleet faces recurring issues, though the airline downplays the severity.