बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 22:17 IST2025-10-16T22:16:24+5:302025-10-16T22:17:13+5:30
Bihar Assembly Election 2025: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, काही कुरबुरी वगळता जागावाटप पूर्ण करून उमेदवारांचीही घोषणा केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा नितीश कुमार यांच्याच गळ्यात पडेल का? याबाबत एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे.
आज तकच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले अमित शाह म्हणाले की, एनडीएच्या विजयानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय आमदार करतील. सध्यातरी बिहारमध्ये एनडीए नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढत आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावर केवळ भाजपाच नाही तर बिहारच्या जनतेलाही विश्वास आहे.
यावेळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना अमित शाह यांनी सांगितले की, कुणाला मुख्यमंत्री बनवणारा मी कोण? आमच्या एनडीएमध्ये एवढे घटक पक्ष आहेत. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसून आपल्या नेत्याची निवड करणार आहोत. सध्यातरी निवडणुकीत आमचं नेतृत्व नितीश कुमार हेच करत आहेत.
भाजपाचे अधिक आमदार निवडून आले तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार का? असं विचारलं असता अमित शाह यांनी सांगितले की, आताही आमचे आमदार अधिक आहेत. मात्र नितीश कुमार हेच मुख्यमंत्री आहेत.