चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:19 IST2025-12-13T08:18:35+5:302025-12-13T08:19:31+5:30
या प्रकाराची दिल्लीत भाजपाचे केंद्रीय संघटक बी.एस. संतोष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाने दखल घेतली

चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
मुंबई - देशात इंडिगो संकटावेळी चार्टर्ड प्लेनन प्रवास अन् सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणे राज्यातील भाजपा नेत्यांना भारी पडलं आहे. संपूर्ण देशात इंडिगोची उड्डाणे रद्द होत असताना अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं होते. विमान प्रवाशांमध्ये असंतोष वाढला होता. त्यातच हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या काही आमदारांनाही इंडिगोच्या कारभाराचा फटका बसला. मात्र भाजपाचे काही आमदार चार्टर्ड प्लेनने नागपूरात दाखल झाले. या नेत्यांनी विमानात घेतलेला सेल्फी सोशल मीडियात व्हायरल झाला आणि लोकांचा राग आणखी वाढला. या प्रकाराची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेत संबंधित भाजपा नेत्यांना चांगलेच फटकारले आहे.
कोणी केला प्रवास?
या चार्टर्ड प्लेननं राज्यातील भाजपा आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आणि सुमीत वानखेडे प्रवास करत होते. त्यासोबत भाजपा माध्यमप्रमुख नवनाथ बनदेखील या आमदारांसोबत होते. या ५ जणांचा सेल्फी फोटो सोशल मीडियावर आला. त्यावरून या नेत्यांविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला. केंद्रीय भाजपा नेतृत्वाने या प्रकाराबाबत चित्रा वाघ, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना सुनावल्याचे पुढे आले आहे. या प्रकाराची दिल्लीत भाजपाचे केंद्रीय संघटक बी.एस. संतोष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाने दखल घेतली. त्यानंतर संबंधित नेत्यांना कठोर इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चित्रा वाघ, प्रसाद लाड आणि दरेकरांवर नाराजी व्यक्त केली.
पक्ष नेतृत्वाने या नेत्यांना जबाबदारीनं वागा, या व्हायरल फोटोमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे आणि सोशल मीडियावर लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे सांगितले. एकीकडे जनता त्रस्त होती, त्यात नेत्यांनी संवेदनशीलतेने वागले पाहिजे असं सांगत पक्षातील नेत्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पक्षातील नेत्यांनी शिस्तीचे पालन करायला हवे अशा कठोर शब्दात वरिष्ठांनी सेल्फी घेणाऱ्या भाजपा नेत्यांना खडसावले आहे. तर जनतेच्या भावनांबद्दल संवेदनशील असणे महत्वाचे आहे. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणारे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही असं फडणवीसांनी संबधितांना फटकारले.
दरम्यान, वरिष्ठांनी फटकारल्यानंतर या नेत्यांनी त्यांची चूक कबूल करत पुन्हा असं घडणार नाही असं आश्वासित केले. गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेचा फटका प्रवाशांना बसत आहे. देशातील अन्य शहरांप्रमाणेच राज्यातील नागपूर या उपराजधानीतून मुंबईकरिता उड्डाण करणाऱ्या विमान सेवेवरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अधिवेशनामुळे नागपूरहून काही व्हीआयपी विमानांना प्राधान्याने पाठवले गेले म्हणून प्रवासी विमानांना उशीर झाल्याची चर्चा होती. नागपूरातून दिल्ली, बेंगलोर, पुणे येथे जाणाऱ्या विमानाचे प्रवासीही नागपूरला अडकून पडले.