अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:03 IST2025-12-11T17:02:59+5:302025-12-11T17:03:47+5:30
अमित शाह यांच्या भाषणानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाह यांच्या भाषणाचे कौतुक केले. ते म्हणाले, शाह यांचे भाषण उत्कृष्ट, तथ्यपूर्ण आणि विरोधकांचा खोटारडेपणा उघड करणारे होते.

अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मत चोरीच्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जोरदार उत्तर दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा गृहमंत्री अमित शाह लोकसभेत बोलत होते, तेव्हा त्यांना १०२ डिग्री एवढा ताप होता. मात्र असे असतानाही ते विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे होते आणि त्यांनी साधारणपणे दीड तास भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या, 'मत चोरी', 'SIR' आणि निवडणूक आयोगातील नियुक्त्या, या प्रत्येक आरोपाला आक्रमकपणे आणि तपशीलवार उत्तरे दिली. तत्पूर्वी, सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना ताप कमी होण्याची औषधी दिली.
अमित शाह यांच्या भाषणानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाह यांच्या भाषणाचे कौतुक केले. ते म्हणाले, शाह यांचे भाषण उत्कृष्ट, तथ्यपूर्ण आणि विरोधकांचा खोटारडेपणा उघड करणारे होते.
राहुल गांधी सातत्याने मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या विधानांना 'हायड्रोजन बॉम्ब' असेही म्हटले आहे. बिहार निवडणुकीपूर्वी त्यांनी या मुद्द्यावर रॅलीही काढली होती. हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.
दरम्यान, विरोधकांची भूमिका दुहेरी असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले, “जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा नवा पोशाख घालून शपथ घेता आणि तुम्हाला सर्व योग्य वाटते. पण जेव्हा बिहारसारखा पराभव होतो, तेव्हा अचानक मतदार यादीत गडबड दिसायला लागते. ही दुहेरी भूमिका आता चालणार नाही.” महत्वाचे म्हणजे, गृहमंत्री उत्तर देण्यासाठी उभे राहिल्यानंतर, काही वेळातच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी सभात्याग केला.
SIR मुद्द्यावर बोलताना शाह म्हणाले, यावर संसदेत चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, तरीही सरकार कोणत्याही मुद्द्यापासून पळत नाही हे दाखवण्यासाठी, विरोधकांची मागणी मान्य करून चर्चेत भाग घेतला. एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे सोपवलेच नाहीत, असा आरोपही अमित शाह यांनी यावेळी केला.