'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:13 IST2024-12-17T20:13:33+5:302024-12-17T20:13:48+5:30
Amit Shah : राज्यघटनेचा केवळ शब्दातच नव्हे, तर कृतीतूनही आदर केला पाहिजे.

'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केला. 'आम्ही घटनादुरुस्ती केली, जीएसटी आणून जनहितासाठी काम केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शंभर वेगवेगळे कायदे रद्द केले. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी, मागास जातींच्या कल्याणासाठी घटना दुरुस्ती केली. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ देण्यासाठी गरिबांच्या कल्याणासाठी तिसरी दुरुस्ती करण्यात आली, असे अमित शाह म्हणाले.
आम्ही घटना दुरुस्ती करुन कल्याणकारी योजना आणल्या
ते पुढे म्हणतात, आम्ही महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन कायदा आणला. ज्या दिवशी या सभागृहात 33 टक्के महिला शक्ती बसेल, त्या दिवशी संविधान निर्मात्यांची कल्पना साकार होईल. काँग्रेसने इतकी वर्षे व्होट बँकेचे राजकारण करून मुस्लिम भगिनींवर अन्याय केला. तिहेरी तलाक संपवून मुस्लिम माता-भगिनींना न्याय देण्याचे काम आम्ही केले. आरिफ मोहम्मद खान मंत्री होते. शाहबानो यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, असे ते म्हणाले. यामुळे त्यांना मंत्रीपद आणि खासदारकीही गमवावी लागली. आम्ही नवीन शैक्षणिक धोरण आणले. शैक्षणिक धोरण येण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या भारतीय न्यायसंहितेच्या माध्यमातून देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे काम मोदी सरकारने केले.
संविधान दाखवण्याचा नाही, विश्वासाचा विषय
राज्यघटनेचा केवळ शब्दातच नव्हे, तर कृतीतूनही आदर केला पाहिजे. या निवडणुकीत एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. प्रचारसभांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हातात संविधान घेऊन दाखवले. संविधान फक्त हातात घेऊन दाखवण्याचा विषय नाही, तर त्यावर विश्वास ठेवण्याचा विषय आहे. संविधान दाखवून जनादेश घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान संविधानाच्या प्रत वाटल्या, पण त्या कोऱ्या होत्या, प्रस्तावनाही नव्हती. 75 वर्षांच्या इतिहासात राज्यघटनेच्या नावाखाली एवढी मोठी फसवणूक कुणीच केली नाही. तुम्ही संविधानाची खोटी प्रत घेऊन फिरत आहात, हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोकांनी तुमचा पराभव केला, अशी घणाघाती टीकाही अमित शाहांनी केली.
आणीबाणीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल
अमित शाह पुढे म्हणतात, 5 नोव्हेंबर 1971 रोजी इंदिरा गांधींच्या सरकारने 24 व्या घटनादुरुस्तीमध्ये संसदेला नागरी हक्क कमी करण्याचा अधिकार दिला. 39व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावरूनही अमित शाहांनी काँग्रेसला धारेवर धरले. ही काय घटनादुरुस्ती होती? अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती. यानंतर घटनादुरुस्तीद्वारे पंतप्रधानपदाच्या न्यायालयीन चौकशीवरही बंदी घातली गेली. एक राज्यकर्ता म्हणतो की, माझी चौकशी कोणी करू शकत नाही आणि आमचे पंतप्रधान म्हणतात की, मी देशाचा सेवक आहे.
परिवर्तन हा जीवनाचा मंत्र आहे, तो संविधान सभेने मान्य केला आणि त्यासाठी घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली. संविधान बदलण्याची तरतूद घटनेतच कलम 368 नुसार आहे. राहुल गांधी भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप करतात. भाजपने 16 वर्षात 16 बदल केले, काँग्रेसनेही बदल केले. त्यांच्या बदलाचा उद्देश काय होता? आम्ही केलेले बदल आपली लोकशाही बळकट करण्यासाठी होते आणि त्यांचे बदल आपली सत्ता टिकवण्यासाठी होते. यातूनच पक्षाचे चारित्र्य दिसून येते, अशी टीकाही शाहांनी यावेळी केली.