भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी; न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 21:49 IST2025-12-27T21:48:31+5:302025-12-27T21:49:12+5:30
Winter Storm In North-East USA: अमेरिकेतील पूर्वोत्तर परिसरात हिमवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाल्याने नाताळानंतर प्रवास करत असलेल्या हजारो प्रवाशांना प्रचंड अचडणींचा सामना करावा लागला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये हवामान आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी; न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम
अमेरिकेतील पूर्वोत्तर परिसरात हिमवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाल्याने नाताळानंतर प्रवास करत असलेल्या हजारो प्रवाशांना प्रचंड अचडणींचा सामना करावा लागला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये हवामान आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे न्यूयॉर्क न्यूजर्सी, कनेक्टिकट आणि आसपासच्या परिसरामध्ये बर्फ आणि हिमवृष्टी झाली. प्रशानसाने हवामानाची चिंताजनक परिस्थिती विचारात घेऊन, लोकंना रस्त्यांवरून प्रवास न करण्याचा सल्ला दिला. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचूल यांनी सांगितले की, न्यूयॉर्कवासियांची सुरक्षा ही माझ्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी या वादळी परिस्थितीदरम्यान, सर्वांना अधिकाधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करते.
राष्ट्रीय हवामान सेवा एनडब्ल्यूएसनुसार सेंट्रल न्यूयॉर्कच्या सिरेक्युजपासून लाँग आयलँडपर्यंत ६ ते १० इंच एवढी हिमवृष्टी झाली आहे. तर न्यूयॉर्क सिटीमध्ये रात्रभर २ ते इंच एवढ्या हिमवृष्टीची नोंद झाली आहे. सेंट्रल पार्कमध्ये ४.३ इंज बर्फ जमला आहे. तो २०२२ नंतर सर्वाधिक आहे. हवामान शास्त्रज्ञ बॉब ओरावेक यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हिमवृष्टीचं सत्र आता थांबलं असून, दुपारपर्यंत सौम्य हिमवृष्टीही थांबेल.
दरम्यान, हिमवृष्टी कमी झाली असली तरी या प्रतिकूल हवामानाचा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे. फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाईटअवेरअरनुसार शनिवारी सकाळपर्यंत अमेरिकेमध्ये १४ हजार ४०० हून अदिक देशांतर्गत विमाने रद्द करण्यात आली होती किंवा उशिराने उड्डाण करत होती. तर अमेरिकेतून ये-जा करणारी सुमारे २१०० आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील रद्द करण्यात आली होती. एवढंच नाही तर न्यूजर्सी आणि पेनिसिल्वेनियामधील अनेक आंतरराज्यीय मार्गांवर व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते.