कोरोनाला रोखण्यात सर्व यंत्रणा ठरल्या अपयशी; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:40 IST2021-04-26T00:06:03+5:302021-04-26T06:40:24+5:30
राहुल गांधी; देशाला आता हवी ‘जन की बात’

कोरोनाला रोखण्यात सर्व यंत्रणा ठरल्या अपयशी; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
नवी दिल्ली : कोरोनाचा हाहाकार रोखण्यास देशातील सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे. आता देशाला ‘मन की बात‘ नव्हे तर ‘जन की बात‘ हवी आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
राहुल गांधी म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. त्यासाठी आपली राजकीय कामे सध्या बाजूला ठेवावीत. जनतेला मदत करणे हाच काँग्रेसचा धर्म आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातील माझ्या आगामी सभा मी रद्द केल्या आहेत.
संकट आणखी गडद
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट येत्या काही काळात आणखी गडद होणार आहे. केंद्र सरकारने लसी, ऑक्सिजन यांचा पुरेसा पुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे.