भारतीय परराष्ट्र सचिवांशी सर्व मुद्यांवर चर्चा होईल : शरीफ
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
लाहोर : पाकिस्तान भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या दौर्याचे स्वागत करील. या दौर्यात काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.
भारतीय परराष्ट्र सचिवांशी सर्व मुद्यांवर चर्चा होईल : शरीफ
लाहोर : पाकिस्तान भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या दौर्याचे स्वागत करील. या दौर्यात काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. शरीफ यांनी पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या संपादकांच्या परिषदेसोबत (सीपीएनई) बैठक घेतली. बैठकीत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पाकिस्तानला शेजार्यांसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत. त्यामुळे भारतीय परराष्ट्र सचिवांच्या पाक दौर्याचे आम्ही स्वागतच करू. जर भारतीय परराष्ट्र सचिव येथे आले तर पाक काश्मीरसह सर्व मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ शरीफ यांच्यासह आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी इतर सार्क देशांच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर त्यांनी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या दौर्याची घोषणा करण्यात आली. मोदींच्या या क्रिकेट डिप्लोमसीला भारत-पाक संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारे म्हटले जाते. उभय देशांतील मुत्सद्दीसंबंध सहा महिन्यांपासून ठप्प आहेत. पाकच्या नवी दिल्लीतील उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केल्याने भारताने ऑगस्टमध्ये पाकिस्तानसोबतची परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा रद्द केली होती. जयशंकर भारताचे इतर सार्क देशांसोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी लवकरच सार्क देशांचा दौरा करतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मोदी यांनी शरीफ यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच ओबामांची शरीफ यांच्याशी चर्चा झाली होती.