Maithili Thakur : "मी व्हेकेशन, आराम विसरली, मला फक्त..."; आमदार होताच जोरदार कामाला लागल्या मैथिली ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:13 IST2025-11-28T12:11:40+5:302025-11-28T12:13:38+5:30
Maithili Thakur : अलीनगर विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर भाजपा आमदार मैथिली ठाकूर जोरदार कामाला लागल्या आहेत.

Maithili Thakur : "मी व्हेकेशन, आराम विसरली, मला फक्त..."; आमदार होताच जोरदार कामाला लागल्या मैथिली ठाकूर
अलीनगर विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर भाजपा आमदार मैथिली ठाकूर जोरदार कामाला लागल्या आहेत. त्यांना मतदारसंघातील लोकांबद्दलच्या जबाबदारीची खोलवर जाणीव झाली आहे. विजयानंतर लोकांसाठी काम करण्याची स्ट्राँग फिलिंग आणि वचनबद्धता जाणवली आणि त्याच उत्साहाने मैदानात उतरल्याचं मैथिली ठाकूर यांनी म्हटलं आहे.
मैथिली ठाकूर हसून म्हणाल्या की, "निवडणूक जिंकल्यानंतर सुटी, आराम किंवा व्हेकेशन या शब्दांचा अर्थ विसरली आहे. मला आतून एक स्ट्राँग फिलिंग येत आहे की, मी आणखी उशीर करू शकत नाही. मला फक्त काम करायचं आहे. मी सतत लोकांना भेटत असते आणि दररोज मी प्रत्येक काम कसं पुढे न्यायचं याचा विचार करते."
"सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार"
"जनतेने मला मोठ्या अपेक्षांनी निवडून दिलं आहे आणि त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार होणं म्हणजे फक्त एक खूर्ची नसून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणं हेच ध्येय आहे." निवडणूक प्रचारादरम्यान, लोकांनी त्यांना परिसरातील अनेक प्रमुख समस्यांबद्दल माहिती दिली. खराब रस्त्यांची परिस्थिती, पाण्याची कमतरता, आरोग्यसेवेचा अभाव आणि रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित समस्या आहेत.
"जनतेने ठेवलेला विश्वास पूर्ण करणं हेच प्राधान्य"
मैथिली म्हणाल्या की, "आमच्या टीमने या समस्यांची एक विस्तृत यादी तयार केली आहे. आता पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच या मुद्द्यांवर काम वेगाने सुरू होईल. प्रत्येक कामाची सुरुवात कशी करायची याचं नियोजन करण्यासाठी दररोज मी टीमला भेटते. जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास पूर्ण करणं हेच प्राधान्य आहे."
लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर लोकगीतांसाठी ओळखल्या जातात आणि बिहारमध्ये त्या खूप प्रसिद्ध आहेत. म्हणूनच जेव्हा मैथिली यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या सर्वसामान्य लोकांसाठी काय, काय करतील हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपाने मैथिली ठाकूर यांना दरभंगा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती.