देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 23:45 IST2025-11-12T23:43:57+5:302025-11-12T23:45:03+5:30
पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची कसून तपासणी NIAच्या पथकांनी केली आहे.

देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी देशातील पाच राज्यांमध्ये मोठी कारवाई करत १० वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. बांगलादेशी अवैध स्थलांतरितांशी जोडल्या गेलेल्या 'अल-कायदा गुजरात टेरर प्लॉट' प्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची कसून तपासणी NIAच्या पथकांनी केली आहे.
काय आहे अल-कायदाचे गुजरात कनेक्शन?
जून २०२३ मध्ये एनआयएने 'अल-कायदा गुजरात केस' (RC-19/2023/NIA/DLI) अंतर्गत अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट कायद्यासह आयपीसी आणि विदेशी अधिनियमच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चार बांग्लादेशी घुसखोर 'अल-कायदा'साठी करत होते काम!
या तपासानुसार, मोहम्मद सोजिजमियां, मुन्ना खालिद अंसारी उर्फ मुन्ना खान, जरुल इस्लाम उर्फ जहांगीर उर्फ आकाश खान आणि अब्दुल लतीफ उर्फ मोमिनुल अंसारी या चार बांग्लादेशी नागरिकांची ओळख पटली आहे. हे सर्वजण अवैधरित्या भारतात घुसले असून, यासाठी त्यांनी बनावट भारतीय ओळखपत्रांचा वापर केला. विशेष म्हणजे, या चौघांचे संबंध थेट बंदी घातलेल्या 'अल-कायदा' या जागतिक दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आहेत.
माइंडवॉश आणि फंडिंगचे मोठे नेटवर्क
१ नोव्हेंबर २०२३ रोजी एनआयएने अहमदाबाद येथील विशेष न्यायालयात या पाचही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपी बांगलादेशमधील 'अल-कायदा'च्या कार्यकर्त्यांसाठी निधी गोळा करणे आणि तो हस्तांतरित करणे यामध्ये सक्रियपणे सहभागी होते. तसेच, भारतातील मुस्लिम तरुणांचे माइंडवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करणे, अशा गंभीर गतिविधींमध्येही ते सामील होते.
डिजिटल उपकरणे जप्त; मोठी यंत्रणा उघडकीस येणार
बुधवारी झालेल्या छापेमारीत एनआयएच्या हाती अनेक डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे लागली आहेत. हे सर्व साहित्य पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. भारतात आणि सीमेपलीकडे सक्रिय असलेल्या दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे, त्यांची लिंक आणि निधीचे स्रोत शोधण्यासाठी एनआयएचा तपास अविरतपणे सुरू आहे. या कारवाईतून आणखी काही महत्त्वाचे स्लीपर सेल उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.