Akhilesh Yadav : "लोकांच्या कष्टाच्या पैशांची भाजपा..."; BSP आमदाराच्या घरावर छापा, अखिलेश यादव आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:36 IST2026-02-26T11:34:57+5:302026-02-26T11:36:57+5:30
Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी बसपा आमदार उमाशंकर सिंह यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

Akhilesh Yadav : "लोकांच्या कष्टाच्या पैशांची भाजपा..."; BSP आमदाराच्या घरावर छापा, अखिलेश यादव आक्रमक
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पार्टीचे (बसपा) आमदार उमाशंकर सिंह यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. सपा प्रमुखांनी 'X' वर एक सविस्तर पोस्ट लिहून भाजपाला 'लोभी' म्हटलं आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या सर्वात कठीण प्रसंगातून जात असते, नेमक्या त्याच वेळी भाजपा त्यांना लक्ष्य करते असं यादव यांनी म्हटलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अखिलेश यादव यांनी योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचं विधानही शेअर केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः आयकर विभागाच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विशेष म्हणजे बसपा आमदार हे मंत्री दिनेश सिंह यांचे नातेवाईक आहेत. सपा अध्यक्षांनी लिहिलं की, "भाजपाचे छापे म्हणजे सरकारी दरोडा आहेत. भाजपाचे छापे लोकांच्या कष्टाच्या पैशांची लूट करण्याचं काम करतात. जिथे कुठे धनसंपत्ती जमा होण्याची शक्यता दिसते, तिथे भाजपा आपली यंत्रणा घेऊन पोहोचते."
सपा प्रमुखांनी पुढे लिहिलं की, "भाजपाचे लोक हृदयशून्य आणि संवेदनहीन आहेत. एखादी व्यक्ती गंभीर आजाराशी झुंजत आहे की इतर कोणत्या संकटात आहे, याचंही भान त्यांना राहत नाही. उलट पैशांचे लोभी असलेले भाजपाचे लोक अशा 'आपत्तीत'ही 'संधी' शोधतात. जेव्हा माणूस मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या हतबल असतो, तेव्हाच त्याला लक्ष्य केलं जातं जेणेकरून तो प्रतिकार करू शकणार नाही आणि त्याचं धन व सन्मान लुटता येईल."
भाजपाई छापे सरकारी डकैती होते हैं।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 25, 2026
भाजपा के छापे लोगों के कमाये गये पैसों को लूटने का काम करते हैं। भाजपाई जहाँ भी देखते हैं कि कहीं धन-दौलत जमा होने की संभावना हो सकती है, वहाँ अपनी एजेंसियाँ लेकर पहुँच जाते हैं। भाजपाई हृदयहीन हैं, इसीलिए संवेदनहीन भी हैं। भाजपाई यह भी नहीं… pic.twitter.com/mmDGh5lo1h
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "भाजपावाल्यांसाठी माता-भगिनींचा सन्मानही काहीच नाही. पीडितांचा छळ करण्याचं कुकृत्य भाजपा करत आहे. खरं तर २०४७ च्या बाता मारणाऱ्यांना हे नीट ठाऊक आहे की ते २०२७ ची निवडणूकही जिंकू शकणार नाहीत. लखनौ असो वा दिल्ली, कोणीही २७ ची मर्यादा ओलांडणार नाही, म्हणूनच आता हे पैसे गोळा करण्याच्या मागे लागले आहेत."
सपा प्रमुखांनी असंही नमूद केलं की, "भाजपाचा पारंपरिक मतदारही आता त्यांच्यापासून दुरावला आहे. पूज्य शंकराचार्यांचा अपमान आणि त्यांच्याविरुद्ध रचलेल्या कटकारस्थानामुळे धार्मिक समाज भाजपाच्या विरोधात उभा ठाकला आहे. व्यापारी वर्ग जीएसटी, भ्रष्टाचार आणि अतोनात वसुलीमुळे त्रस्त आहे. आज समाजही या घृणास्पद छाप्यामुळे भाजपाला पूर्णपणे नाकारत आहे."
माजी मुख्यमंत्री यादव पुढे म्हणाले की, "कोणी गंभीर परिस्थितीत असताना टाकला गेलेला हा छापा कोणत्याही दृष्टीने योग्य ठरवता येणार नाही. यामागे दिल्लीचे जे काही षडयंत्र आहे, त्याचा एक ना एक दिवस पर्दाफाश होईलच. लोकांना त्रास देण्यासाठी भाजपा कधी खोट्या केसेस दाखल करते, तर कधी संकटाच्या वेळी मुद्दाम छापे टाकते. काल हे दुःख विरोधकांनी सोसलं, आज भाजपामधील लोकच त्याचे शिकार होत आहेत."