लखनौ - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 19 मे रोजी होणारे शेवटच्या फेरीतील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. दरम्यान, सर्व नेत्यांची उपस्थिती निश्चित झाल्यानंतर ही बैठक 21 मे रोजी आयोजित होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यादंर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावत आणि अखिलेश यादव यांनीही निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी बोलावलेल्या अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच या बैठकीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे समाजवादी पक्षाचे मत आहे. असे पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत अखिलेश यादव सहभागी होणार नाहीत.
विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:45 IST