वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:31 IST2025-10-25T05:30:27+5:302025-10-25T05:31:04+5:30
सर्व क्षेत्रांमध्ये आरोग्य सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून धोरणात्मक बदल करणे अपरिहार्य आहे.

वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे आणि मृत्यूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, असा इशारा हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५’ या अहवालात देण्यात आला आहे.
या अहवालानुसार, २०२३ मध्ये देशात सुमारे २० लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झाला. तज्ज्ञांचे मत आहे की, सर्व क्षेत्रांमध्ये आरोग्य सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून धोरणात्मक बदल करणे अपरिहार्य आहे.
८९ टक्के प्रकरणे ही गैर-संसर्गजन्य आजारांनी : अहवालानुसार, ही संख्या वर्ष २००० च्या तुलनेत तब्बल ४३ टक्क्यांनी अधिक आहे. मृत्यूंपैकी सुमारे ८९ टक्के प्रकरणे ही गैर-संसर्गजन्य आजारांशी - जसे की हृदयरोग, स्ट्रोक, फुप्फुसांचे आजार आणि मधुमेह या संबंधित होती. भारतात वायू प्रदूषणामुळे प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे सरासरी १८६ मृत्यू होतात, तर विकसित देशांमध्ये हा दर फक्त १७ इतका आहे.
अहवालातील ठळक मुद्दे :
भारतातील सीओपीडी (फुप्फुस विकार) मुळे होणाऱ्या ७० टक्के मृत्यूंचे कारण वायू प्रदूषण आहे.
फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या प्रत्येक तीन मृत्यूपैकी एक मृत्यू प्रदूषित हवेशी संबंधित आहे.
हृदयरोगामुळे होणाऱ्या चार मृत्यूपैकी एकाहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात.
प्रदूषणजन्य आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू या राज्यांत
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही राज्ये प्रदूषणजन्य आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू नोंदवणाऱ्या राज्यांच्या यादीत आघाडीवर आहेत.
घरगुती इंधनामुळे होणारे प्रदूषण काहीसे कमी झाले असले, तरी बाह्य प्रदूषक विशेषतः पीएम २.५ कण आणि ओझोन वायू झपाट्याने वाढले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कठोर उपाययोजना त्वरित न राबविल्यास आरोग्यसंकट गडद होईल.